अबुधाबी : मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आजचा सामना थरारक असाच झाला. हा सामना सुपर ओव्हरमध्येही बरोबरीत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुन्हा दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईची प्रथम फलंदाजी होती. मुंबईला यावेळी ११ धावा करता आल्या. त्यामुळे विजयासाठी पंजाबपुढे १२ धावांचे आव्हान होते. पंजाबला हे आव्हान यशस्वीरीत्या पेलवून दाखवले आणि त्यांनी मुंबईवर एकही विकेट न गमावता विजय मिळवला.

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईची प्रथम गोलंदाजी होती. मुंबईच्या जसप्रीत बुमराने यावेळी सुपर ओव्हरमध्ये भेदक मारा केला आणि त्यामुळे पंजाबचा एक फलंदाज गमावून पाच धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनाही पाच धावाच करता आल्या. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये हा सामना बरोबरी झाला आणि दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

मुंबई इंडियन्स आणि पंजाब यांच्यातील सामना चांगलाच थरारक झाला आणि सुपर ओव्हरमध्ये गेला. कारण मुंबईने पंजाबपुढे यावेळी विजयासाठी १७७ धावांचे आव्हान ठेवले होते. किंग्स इलेव्हन पंजाबला फलंदाजी करताना यावेळई मुंबई एवढ्याच १७६ धावा करता आल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी साकारली होती. पण बुमराने त्याचा काटा काढला आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण त्यानंतर ख्रिस जॉर्डन आणि दीपक हुडा यांनी दमदार फलंदाजी केली आणि आव्हान जीवंत ठेवले होते. अखेरच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना पंजाबला एकच धाव घेता आली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.

मुंबईच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंबाजला चांगली सुरुवात करता आली नाही. कारण मुंबईच्या जसप्रीत बुमराने यावेळी मयांक अगरवालला बाद केला, मयांकला यावेळी ११ धावा करता आल्या. मयांक बाद झाल्यावर ख्रिस गेल आणि कर्णधार लोकेश राहुल यांची चांगलीच जोडी जमली. यादोघांनी यावेळी मुंबईच्या गोलंदाजीवर दडपण आणले होते. पण मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने यावेळी गेलचा काटा काढला, गेलला यावेळी २४ धावा करता आल्या.

मयांक आणि गेल बाद झाले असले तरी राहुल यावेळी दमदार फटकेबाजी करत होता. राहुलला यावेळी काही काळ निकोलस पुरनची चांगली साथ मिळाली. पण यावेळी पुन्हा एकदा बुमराने मुंबईला तिसरे यश मिळवून दिले. बुमराने यावेळी पुरनला बाद केले, पुरनने यावेळी १२ चेंडूंत २४ धावा केल्या. त्यानंतर फलंदजीला आला तो ग्लेन मॅक्सवेल. यावेळी पंजाबला मॅक्सवेलकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण मॅक्सवेलकडून या अपेक्षांची पूर्ती झालेली पाहायला मिळाली. मॅक्सवेलला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. राहुल चहरने मॅक्सवेलला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. पण कर्णधार राहुलने अर्धशतक झळकावत आपले आव्हान जीवंत ठेवले होते. पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. बुमराने यावेळी राहुलला बाद करत मुंबईला मोठे यश मिळवून दिले. राहुलने यावेळी ५१ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७७ धावांची खेळी साकारली.

क्विंटन डीकॉकचे अर्धशतक आणि अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या जोरदार फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात पंजाबपुढे १७७ धावांचे आव्हान ठेवता आले. मुंबईची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांची ३ बाद ३८ अशी अवस्था होती. पण त्यानंतर क्विंटन डीकॉकने अर्धशतक झळकावत मुंबईच्या संघाला चांगला आकार दिला. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये किरॉन पोलार्ड आणि नॅथन कल्टर-नाइल यांनी तुफानी फटकेबाजी केली. पोलार्डने यावेळी १२ चेंडूंत १ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ३४ धावा केल्या, तर नॅथनने चार चौकारांच्या जोरावर १२ चेंडूंत नाबाद २४ धावा केल्या. त्यामुळे मुंबईच्या संघाला यावेळी किंग्स इलेव्हन पंजाबपुढे सन्मानजनक आव्हान ठेवता आले. डीकॉकने यावेळी ४३ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here