राजकोट: ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी वनडे सौराष्ट्र स्टेडियमवर होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत १-०ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना करो वा मरो असा आहे. पहिल्या सामन्यात १० विकेटनी पराभव झाल्यानंतर आता भारतीय संघावर अधिक दडपण आहे. राजकोट मैदानावरील भारताचा इतिहास अत्यंत खराब आहे.

राजकोट येथे भारताने दोन वनडे सामने खेळले आहेत आणि त्या दोन्ही सामन्यात पराभव झाला आहे. ११ जानेवारी २०१३ रोजी भारताने इंग्लंड विरुद्ध येथे पहिला सामना खेळला होता. या सामन्यात भारताचा ९ धावांनी पराभव झाला होता तर १८ ऑक्टोबर २०१५ रोजी दक्षिण आफ्रिकेने भारताचा १८ धावांनी पराभव केला होता.

ऑस्ट्रेलिया संघाचा विचार केल्यास या मैदानावर त्यांनी भारताविरुद्ध १० ऑक्टोबर २०१३ रोजी टी-२० सामना खेळला होता. या सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. राजकोट येथे त्याआधी क्रिकेटचे सामने जुन्या मैदानावर होत असत. त्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने ऑक्टोबर १९८६ मध्ये वनडे सामना खेळला होता. तेव्हाही भारताचा सात विकेटनी पराभव झाला होता.

वाचा-

भारतीय संघ राजकोट येथे चार वर्षानंतर वनडे सामना खेळत आहे. या मैदानावर दोन्ही संघांमध्ये होणारी ही पहिली लढत आहे. मालिकेत १-०ने पिछाडीवर आहे. मालिकेतील अस्तित्व कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने काही प्रयोग केले होते पण त्याचा फायदा झाला नव्हता.

वाचा-

राजकोट सामन्यात विराट पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्याची शक्यता आहे. तर केएल राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. पंतच्या जागी अष्टपैलू शिवम दुबे याला संधी मिळेल. दुबेमुळे संघात फलंदाजी आणि गोलंदाज असे दोन्ही पर्याय उपलब्ध होईल.

संघात होणार बदल?

पहिल्या वन-डेत डोक्याला चेंडू लागल्याने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला दुसऱ्या वन-डेला मुकावे लागले आहे. मात्र, पंतच्या अनुपस्थितीत कोणाला अंतिम अकरात स्थान मिळेल, याबाबत उत्सुकता आहे. मनीष पांडे आणि केदार जाधव यांच्यात मोठी स्पर्धा असेल. शिवम दुबे हा आणखी एक पर्याय संघव्यवस्थापनासमोर आहे.

सैनीला मिळणार संधी?

वानखेडेवर झालेल्या पहिल्या वन-डेत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा, अॅश्टन एगर यांनी अचूक मारा करून भारताला २५५ धावांत रोखले होते. या उलट भारताच्या महंमद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा यांना ऑस्ट्रेलियाची सलामी जोडीही फोडता आली नव्हती. सलामीच्या अॅरन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने विजयी लक्ष्य ३७.४ षटकांतच पूर्ण केले होते. अशा स्थितीत राजकोट वन-डेत गोलंदाजीत बदल होतील का, याबाबतही उत्सुकता आहे. नवदीप सैनीला स्थान मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

धावांचा पाऊस अपेक्षित

राजकोटमध्ये सध्या दिवसाचे तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. त्यामुळे येथील खेळपट्टी कोरडी ठणठणीत आहे. सपाट खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता विर्तविण्यात आली आहे.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here