दुबई : दिल्लीचा कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राला ३ ऑक्टोबरला दुखापत झाली होती. ही दंखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे मिश्राला आता या आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. पण मिश्राच्या जागी आता दिल्लीच्या संघात एका युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. या खेळाडूने आतापर्यंत स्थानिक सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. या युवा फिरकीपटूचे नाव आहे प्रवीण दुबे.

प्रवीण हा कर्नाटककडून क्रिकेट खेळणारा युवा लेग स्पिनर आहे. आतापर्यंत स्थानिक सामन्यांमध्ये प्रवीणने चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारतामधील स्थानिक ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये १६ बळीही मिळवलेले आहेत. त्यामुळे आता दिल्लीच्या संघात संधी मिळवल्यावर प्रवूण नेमकी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आपल्या पत्रकामध्ये याबाबतची माहिती दिली आहे. या पत्रकामध्ये म्हटले आहे की, ” दिल्लीच्या संघातील अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राला ३ ऑक्टोबरला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे तो भारतामध्ये या दुखापतींवर उपचार घेणार आहे. अमितच्या जागी संघामध्ये आम्ही युवा फिरकीपटू प्रवीण दुबेला संधी देत आहोत.”

दिल्लीच्या संघाला दुखापतींनी ग्रासले होते. दुखापतीमुळे दिल्लीच्या अमित मिश्रा आणि इशांत शर्मा यांना या आयपीएलमध्ये आता खेळता येणार नाही. काही दिवसांपूर्वी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरलाही दुखापत झाली होती. पण त्यानंतरच्या सामन्यात तो मैदानात दिसला होता. काही दिवसांपूर्वी पंतलाही दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे पंतला काही सामन्यांना मुकावे लागले होते. पण आता तो पूर्णपणे फिट झाल्याचे म्हटले जात आहे.

सध्याच्या घडीला दिल्लीचा संघ हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. आतापर्यंतच्या ९ सामन्यांमध्ये दिल्लीने सात सामने जिंकले आहेत, त्यामुळे १४ गुणांसह ते अव्वल स्थानवर आहेत. आजचा सामना जर दिल्लीच्या संघाने जिंकला तर त्यांचे १६ गुण होतील आणि बाद फेरीसाठी ते आपली दावेदारी सिद्ध करू शकतात. त्यामुळे आजचा सामना दिल्लीसाठी महत्वाचा असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here