नवी दिल्ली : बॉलीवूड आणि क्रिकेटचे जुने नाते आहे. आयपीएलमधील संघही काही बॉलीवूड स्टार्सने खरेदी केलेले आहेत. आता यामध्ये बॉलीवूडचा भाईजान असलेला सलमान खानही उतरला आहे. सलमानच्या कुटुंबियांनी ट्वेन्टी-२० लीगमधील एक संघ विकत घेतला आहे. सलमानच्या या संघात युनिवर्स बॉस आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलही खेळणार असल्याचे आता समोर आले आहे.

सलमान खानच्या कुटुंबियांनी आता श्रीलंका प्रीमिअर लीगमधील एक संघ विकत घेतला असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियने दिलेली आहे. सलमानचा भाऊ सोहेल खान आणि वडिल सलीम यांची एक कंपनी आहे. या कंपनीचे नाव सोहेल खान इंटरनॅशनल असे आहे. या कंपनीला श्रीलंका प्रीमिअर लीगमध्ये फार क्षमता दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी या लीगमधील एक संघ विकत घेतला आहे.

सलमानचा भाऊ सोहेलने यावेळी सांगितले की, ” आमच्या संघामध्ये बरेच नामांकित खेळाडू आहेत, त्यामुळ हा संघ या लीगमध्ये धमाल करेल, असे मला वाटते. या लीगमधील सर्व सामने पाहायला सलमान श्रीलंकेला जाणार आहे. आमच्या संघात ख्रिस गेलसारखा धडाकेबाज खेळाडू आहे. पण या लीगमध्ये स्थानिक खेळाडूला आयकॉन बनवायचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे श्रीलंकेचा कुशल परेरा हा आमच्या संघाचा आयकॉन असेल.”

आपल्या संघातील खेळाडूंबाबत सोहेल म्हणाला की, ” आमच्या संघात ख्रिस गेल, कुशल परेरा यांच्यासह लायम प्लंकेट, वहाब रियाझ, कुशल मेंडिस आणि नुवान प्रदीप यांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आमचा संघ चांगलाच समतोल दिसत आहे आणि या खेळाडूंकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत.”

आतापर्यंत जगभरातील ट्वेन्टी-२० लीगमध्ये बऱ्याच बॉलीवूडच्या सेलिब्रेटीनी संघ विकत घेतले आहे. आयपीएलमध्ये शाहरुख खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी यांचे संघ आपल्याला दिसतात. त्याचबरोबर कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये शाहरुख खाननेही एक संघ विकत घेतल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे आता श्रीलंकेच्या ट्वेन्टी-२० लीगमध्येही भारतातील बॉलीवूड सेलिब्रेटीने एक संघ आता विकत घेतला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here