आजच्या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा खेळू शकला नाही. त्यामुळे रोहितऐवजी संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्डकडे सोपवण्यात आले होते. आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला. त्यावेळी पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय किती योग्य होता, हे पाहायला मिळाले. चेन्नईच्या फलंदाजीचा आजच्या सामन्यात फज्जा उडाल्याचेच पाहायला मिळाले. कारण त्यांना पहिल्याच षटकात एकही धाव नसताना पहिला धक्का बसला. या धक्क्यातून चेन्नईचा संघ सावरताना पाहायला मिळाला नाही.
मुंबईच्या ट्रेंट बोल्टने आपल्या पहिल्याच षटकात चेन्नईचा सलामावीर ऋतुराज गायकवाडला बाद केला. ऋतुराजला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर दुसरे षटक घेऊन आला तो जसप्रीत बुमरा. या षटकात बुमराने चेन्नईला दोन धक्के दिला. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बुमराने अंबाती रायुडूला बाद केले, त्याला दोन धावा करता आल्या. यानंतरच्या चेंडूवर बुमराने युवा जगदीशनलाही तंबूचा रस्ता दाखवला. जगदीशनलाही यावेळी भोपळा फोडता आला नाही. बुमराला यावेळी हॅट्ट्रीक घेण्याची संधी होती, पण त्यामध्ये त्याला यश आले नाही.
तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा चेन्नईला धक्का बसला. बोल्टने या षटकात फॅफ ड्यू प्लेसिसला बाद करत चेन्नईला चौथा धक्का दिला. यावेळी चेन्नईची ४ बाद ३ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर काही काळ महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजाची जोडी जमली. पण या जोडीलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कारण बोल्टने सहाव्या षटकात जडेजाला बाद करत ही जोडी फोडली. जडेजाला यावेळी सात धावा करता आल्या.
या सर्व पडझडीनंतर सर्वांच्या नजरा धोनीकडे लागलेल्या होत्या. धोनीने यावेळी सातव्या षटकात मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरला खणखणीत षटकार लगावला. आता पुन्हा एकदा जुना धोनी पाहायला मिळेल, असे चाहत्यांना वाटत होते. पण त्यानंतरच्याच चेंडूवर चहरने धोनीला बाद केले आणि चेन्नईला मोठा धक्का बसला. धोनी बाद झाल्यावर युवा सॅम करनने काही धावा जमवल्या. त्यामुळेच चेन्नईचा थोडी बरी धावसंख्या उभारता आली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times