पंजाबच्या १२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची चांगली सुरुवात झाली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी संघाला ५६ धावांची सलामी दिली. पण रिव्हर्स स्विप मारण्याच्या नादात वॉर्नरने यावेळी आपली विकेट गमावली. वॉर्नरने २० चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३५ धावा केल्या. वॉर्नर बाद झाल्यावर जॉनी जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. त्यानंतरच्याच षटकात मुरुगन अश्विनने जॉनीला बाद केले, त्याला १९ धावांवर समाधान मानावे लागले.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यावर अब्दुल समद यावेळी चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी आला होता. पण समदला पंजाबचा वेगवान गोलंदाज मोदम्मद शमीने बाद केले, समदला ७ धावा करता आल्या. समद बाद झाल्यावर मनीष पांडे आणि विजय शंकर यांची चांगलीच जोडी जमली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी दमदार भागीदारी रचत संघाचा विजय दृष्टीपथात आणला होता.
सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीपुढे आज किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ ढेपाळल्याचे पाहायला मिळाले. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांना या सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नाही आणि याचाच फटका त्यांच्या संघाला बसला. हैदराबादच्या गोलंदाजांनी यावेळी भेदक मारा केला. हैदराबादकडून रशिद खान, जेसन होल्डर आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत पंजाबच्या धावसंख्येला वेसण घातले. त्यामुळेच पंजाबला या सामन्यात हैदराबादपुढे १२७ धावांचे आव्हान ठेवता आले.
हैदराबादच्या संघाने यावेळी नाणफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या संघात आज मयांक अगरवालला स्थान देण्यात आले नाही. त्याच्याजागी लोकेश राहुलबरोबर सलामी करण्यासाठी मनदीप सिंग आला होता. मनदीप आणि राहुल यांनी चांगली सलामी केली. पण पाचव्या षटकात हैदराबादच्या संदीप शर्माने मनदीपला बाद केले आणि पंजाबला पहिला धक्का दिला. मनदीपला यावेळी १७ धावा करता आल्या.
मनदीप बाद झाल्यावर ख्रिस गेल फलंदाजीला आला. गेल आणि राहुल यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. या दोघांनी काही काळ चांगली फलंदाजी केली. पण सलग दोन चेंडूंवर हे दोघे बाद झाले आणि पंजाबच्या संघाला दुहेरी धक्के बसले. गेलला यावेळी जेसन होल्डरने कर्णधार डेव्हिड वॉर्नरकरवी आपल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर झेल बाद केले. गेलला यावेळी २० धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर रशिद खानने आपल्या पहिल्याच चेंडूवर राहुलला त्रिफळाचीत केले. राहुलला यावेळी २७ धावा करता आल्या.
गेल आणि राहुल हे दोघेही बाद झाल्यावर खेळपट्टीवर ग्लेन मॅक्सवेलसारखा अनुभवी फलंदाज होता. पण मॅक्सवेलला यावेळी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मॅक्सवेलला यावेळी फक्त १२ धावा करता आल्या. मॅक्सवेलनंतर फलंदाजीला आलेल्या दीपक हुडाला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times