मुंबईचा बाद फेरीतील आपले स्थान निश्चित करायचे असेल, तर त्यांना आजचा सामना जिंकणे महत्वाचे असेल. सध्याच्या घडीला गुणतालिकेत मुंबई, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी या तिन्ही संघांचे समान १४ गुण आहेत. पण रनरेटच्या जोरावर मुंबईचा संघ अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे आरसीबीच्या संघाने आज विजय मिळवला तर ते अव्वल स्थानावर पोहोचू शकतात, कारण या विजयानंतर त्यांचे १६ गुण होतील. त्यामुळे मुंबईने सामना गमावला तर त्यांना अव्वल स्थान सोडावे लागू शकते. पण आरसीबीचा संघ पराभूत झाला तर मुंबईचा संघ अव्वल स्थानावर कायम राहू शकतो.
गेल्या सामन्यात रोहित शर्मा खेळला नव्हता. पण तरीही मुंबईच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सच्या संघावर दणदणीत विजय मिळवला होता. रोहितच्या जागी सलामीला आलेल्या इशान किशनने गेल्या सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावले होते. त्याला क्किंटन डीकॉकने चांगली साथही दिली होती. त्याचबरोबर मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत चेन्नईच्या फलंदाजीची हवाच काढून टाकली होती. मुंबईचे ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमरा हे दोन्ही गोलंदाज भन्नाट फॉर्मात आहेत. आतापर्यंत या दोघांनी संघाला लवकर यश मिळवून दिले आहे. त्याचबरोबर फिरकीपटू राहुल चहरही अचूक मारा करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
राजस्थानचा संघ आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये चार विजयांसह आठ गुण मिळवू शकला आहे. त्यामुळेच त्यांचे बाद फेरीतीतल आव्हान अजूनही कायम आहे. राजस्थानने या मोसमाची सुरुवात झोकात केली होती. पण त्यानंतर त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. गेल्या चार सामन्यांमध्ये राजस्थानच्या संघाला तीन पराभव स्वीकारावे लागले आहेत. त्यामुळे मुंबईच्या संघासमोर त्यांचे पारडे जड दिसत नाही. पण मुंबईच्या संघाला धक्का देण्याची कुवत राजस्थानमध्ये नक्कीच आहे. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times