राजकोट : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डेतील विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने केएल राहुलचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ‘आपण सोशल मीडियाच्या युगात राहतो, जिथे पॅनिक बटण लगेच दाबलं जातं. मैदावर सर्वोत्कृष्ट संघ कोणता आहे, हे माहित करुन घेणं अत्यावश्यक असतं. तुम्ही लोकेश राहुलला आज जेव्हा मैदानावर फलंदाजी करताना पाहता, तेव्हा त्याच्यासारख्या खेळाडूंना बाहेर काढणं अत्यंत कठीण आहे,’ अशी प्रतिक्रिया विराटने दिली.

केएल राहुलने राजकोट वन डेत मधल्या फळीत भक्कम फलंदाजी केली. ५२ चेंडूत त्याने ८० धावा कुटल्या आणि भारतीय संघाला ३४० धावांपर्यंत मजल मारण्यात मोलाचं योगदान दिलं. भारताने यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव ३०४ धावात गुंडाळला. या विजयासोबतच भारताने तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर मुंबईतील सामन्यात १० विकेट्स राखून मोठा विजय मिळवला होता. आता अखेरचा निर्णायक सामना रविवारी बंगळुरूमध्ये खेळवला जाईल.

‘संघाला हवी तशी आणि तेही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणं हे निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर राहुलचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन होतं. या खेळीने त्याची परिपक्वता आणि स्तर दाखवून दिला. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये काय करतो ते आम्हाला माहित असतं. मैदानाच्या बाहेर बरीच चर्चा होते, पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाही’, असंही म्हणाला.

दरम्यान, पहिल्या वन डेच्या तुलनेत दुसऱ्या वन डेत भारतीय फलंदाजीचा क्रम बदललेला पाहायला मिळाला. यावेळी केएल राहुलच्या जागी विराट स्वतः तिसऱ्या क्रमांकावर आला. यावर तो म्हणाला, ‘तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय चांगला होता आणि त्याचा संघाला फायदा झाला याचा आनंदही आहे. वन डेमध्ये शिखर धवनने कायम चांगली कामगिरी केली आहे. त्याने धावा काढल्या याचा मला आनंद आहे. रोहितही जेव्हा धावा काढतो, त्याचा संघाला नेहमीच फायदा होतो’, असं विराट म्हणाला.

दरम्यान, या सामन्यातील महत्त्वपूर्ण खेळीनंतर राहुलला सामनावीराचा मान देण्यात आला. कधी सलामीला, कधी तिसऱ्या क्रमांकावर, तर कधी पाचव्या क्रमांकावरही राहुलने स्वतःला सिद्ध करुन दाखवलं. यावर तो म्हणाला, ‘मला विविध भूमिकांमध्ये रहायला नेहमीच आवडतं. मी यापेक्षा चांगल्या सुरुवातीची अपेक्षा करू शक तनाही. प्रत्येक दिवशी मला वेगवेगळ्या भूमिका दिल्या जातात आणि मी त्याचा आनंद घेतो.’

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here