राजकोट : मधल्या काही षटकात अत्यंत कमी वेळात तीन विकेट्स गमावल्यामुळे आमचा पराभव झाला, अशी प्रांजळ कबुली ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने दिली. राजकोट वन डेत भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी मात केल्यानंतर स्मिथ बोलत होता. ३० ते ४० व्या षटकात तीन विकेट गमावल्या तेव्हाच आम्ही सामना गमावला होता. कारण, वेगाने धावा करणारा कोणताही फलंदाज आमच्याकडे उरला नव्हता, असंही स्मिथ म्हणाला.

‘टिकून फलंदाजी करणारा एखादा फलंदाज आमच्याकडे असता, तर कदाचित परिस्थिती वेगळी राहिली असती. पण आम्हाला पराभव पाहावा लागला’, असं स्मिथ म्हणाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३४० धावा केल्या. ३४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला सर्वबाद ३०४ धावांपर्यंतच मजल मारता आली. मार्नस लाबुशाने ३१ व्या षटकात बाद झाला, तर कुलदीप यादवने ३८ व्या षटकात एलेक्स कॅरी आणि स्मिथला माघारी पाठवलं आणि सामना भारताच्या बाजूने झुकला.

मार्नससोबतच्या खेळीवरही स्मिथने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘मार्नसने वन डे क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच डावात चांगली फलंदाजी केली. आम्ही काही वेळ प्रति षटक सहा धावा याप्रमाणे खेळ करत होतो. चांगले फटकारही मारले जात होते. तेव्हा चांगली रणनिती होती, पण ३० ते ४० व्या षटकात तीन विकेट्स लवकर गमावल्यामुळे मोठं नुकसान झालं’, असं तो म्हणाला.

भारताच्या विजयात मधल्या फळीतील भागीदारी अत्यंत महत्त्वाची ठरल्याचंही स्मिथने बोलून दाखवलं. तो म्हणाला, ‘आम्ही वन डे सामन्यासाठी आमचं सर्वसाधारण धोरण अवलंबलं. गोलंदाजी करताना लवकरात लवकर विकेट्स घेणे आणि धावांवर लगाम घालणे हे आमचं धोरण होतं. पण भारताने काही चांगल्या भागीदारी केल्या. विराट, शिखर आणि केएल राहुलने खरोखर चांगली फलंदाजी केली.’

दरम्यान, स्मिथनेही या सामन्यात टिकून फलंदाजी केली. याबाबत तो म्हणाला, ‘धावा काढणं चांगलं असतं. पण मी अजून काही काळ टिकून लक्ष्य गाठलं असतं तर आणखी चांगलं राहिलं असतं. मी कट करण्याच्या प्रयत्नात चुकीचा फटकार लगावला. या षटकात आमची परिस्थिती चांगली नव्हती. एलेक्सची विकेटही लवकरच गमावली.’

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here