इनसाइट स्पोर्ट्स या संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिली आहे. इनसाइट स्पोर्ट्सला मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी याबाबत काही माहिती दिली आहे. यामध्ये रोहित हा आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. त्याचबरोबर आणखी काही सामने रोहितला खेळता येणार नाही, असे या संकेतस्थळाने म्हटलेले आहे.
सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर मुंबईचा संघ जवळपास बाद फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे अशा काळात कोणताही संघ रोहितसारख्या मोठ्या खेळाडूबाबत जास्त जोखीम उचलणार नाही. जोपर्यंत रोहित पूर्णपणे फिट होत नाही, तोपर्यंत रोहितला विश्रांती देण्याचा विचार मुंबई इंडियन्सचा संघ करत असेल. रोहित आजच्या आससीबीविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती मुंबई इंडियन्सने दिलेली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात ही गोष्ट स्पष्ट होण्यासाठी नाणेफेकीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
गेल्या दोन सामन्यांत रोहितच्या जागी मुंबईच्या संघाची धुरा पोलार्डकडे सोपवण्यात आली होती. पोलार्डच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने पहिल्या सामन्यात दणदणीत विजयाची नोंद केली होती. पण त्यांतर दुसऱ्या सामन्यात मात्र मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहितला खेळवायचे की नाही, याचा विचार नक्कीच मुंबई इंडियन्सच्या संघाने केला असेल. पण त्यांच्यासाठी रोहितची दुखापत आणि बाद फेरीतील सामने जास्त महत्वाचे असतील, असे म्हटले जात आहे.
(इनसाइट स्पोर्ट्स या संकेतस्थळाने ही बातमी दिली असून त्याच्याशी महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमचा संबंध नाही. या वृत्ताची जबाबदारी महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम घेत नाही.)
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times