वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्ली आणि विदर्भ यांच्यातील सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या घोट्याला जबर दुखापत झाल्याने आगामी न्यूझीलंड दौऱ्यातील त्याच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उद्या या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होणार आहे.

विदर्भच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना इशांत शर्माला त्याच्या तिसऱ्या षटकात ही दुखापत झाली. दिल्ली संघव्यवस्थापनाच्या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, इशांतच्या घोटा मुरगळला असून त्याला सूज आली आहे. सद्यस्थितीत ही दुखापत गंभीर आहे. त्यामुळे विदर्भविरुद्धच्या सामन्यात त्याला पुढे खेळविण्याचा धोका आम्ही पत्करणार नाही. अपेक्षा आहे की घोट्याचे हाड मोडलेले नसेल.

या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर ही केवळ सूज असेल तर काही दिवसांत तो पूर्णपणे बरा होईल. अर्थात, त्याला राष्ट्रीय अकादमीत पुढील उपचारांसाठी जावे लागेल. तिथे उपचार घेऊन तो पुन्हा खेळण्यास सज्ज होऊ शकेल. आम्हाला त्याच्या एमआरआय रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

इशांतने या लढतीत विदर्भच्या फैझ फझलला टाकलेला चेंडू त्याच्या पॅडवर आदळला आणि इशांतने गोलंदाजीची क्रिया पूर्ण झाल्याझाल्या जोरदार अपील केले. त्याचवेळी तो घसरला. त्यावेळी त्याला भरपूर वेदना जाणवली. तात्काळ त्याला वैद्यकीय मदत देण्यात आली. विदर्भविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या डावात त्याने ३ बळी घेतले होते.

जर तो न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात स्थान मिळवू शकला तर ही त्याची या हंगामातील अखेरची लढत असेल. भारत न्यूझीलंडमध्ये २१-२५ फेब्रुवारी आणि २९ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत दोन कसोटी सामने खेळणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here