ब्लूफाँटन: १९ वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या जपान विरुद्धचा सामना भारतीय संघाने १० विकेटनी जिंकला. ग्रुप ए मधील भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजीपुढे जपानचा संघ अवघ्या ४१ धावांवर बाद झाला. भारताने विजयाचे लक्ष्य एकही विकेट न गमवता पार केले.

जपानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने एक नवा विक्रम केला. या सामन्यात भारताने २७१ चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळवला. १९ वर्षाखालील क्रिकेटमधील हा सर्वात दुसऱ्या क्रमांकाचा विजय ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने २००४च्या वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडवर २७७ चेंडू राखून विजय मिळवला होता.

१९ वर्षाखालील क्रिकेटमधील भारताचे मोठे विजय

जपान विरुद्ध २७१ चेंडू आणि १० विकेटनी, ब्लूफाँटन- २०२०

पीएनजी विरुद्ध २५२ चेंडू आणि १० विकेट, माउंट मॉगानुई- २०१८

श्रीलंका विरुद्ध २४५ चेंडू आणि १० विकेट, जोहान्सबर्ग- २०१०

ऑस्ट्रेलिविरुद्ध २२८ चेंडू आणि १० विकेट, विशाखापट्टणम, २०११

बांगलादेश विरुद्ध २१९ चेंडू आणि ७ विकेट, कोलकाता २०१५

जपान विरुद्ध भारताचा कर्णधार प्रियम गर्ग याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला आणि एका पाठोपाठ एक विकेट घेतल्या. जपानचा संघ अवघ्या २२.५ षटकात ४१ धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे जपानच्या या ४१ धावांमध्ये भारतीय संघाने दिलेल्या १९ अतिरिक्त धावांचा देखील समावेश आहे.

विजयासाठीच्या ४२ धावांचे लक्ष्य भारताने ४.५ षटकात एकही विकेट न गमवता पार केले. भारताकडून यशस्वी जैस्वालने नाबाद २९ तर कुमार कुशाग्रने नाबाद १३ धावा केल्या. ग्रुप फेरीतील तीन पैकी दोन विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान या सामन्यात १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम जपानच्या नावावर नोंदवला गेला.

जपानकडून एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. त्यांचे ५ फलंदाज शून्यावर बाद झाले. भारतीय संघाकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक ४, कार्तिक त्यागीने ३, आकाश सिंहने दोन विकेट घेतल्या. तर विद्याधर पाटीलने एक विकेट घेतली.

१९ वर्षाखालील वर्ल्ड कपमधील सर्वात कमी धावा

स्कॉटलंड- २२ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चितगाव-२००४

बांगलादेश- ३४ धावा विरुद्ध भारत, लाहोर- २००३

कॅनडा- ४१ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ऑकलंड- २००२

बांगलादेश- ४१ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, क्वालालांपुर- २००८

जापान- ४१ विरुद्ध भारत, ब्लूफाँटन- २०२०

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here