ऑकलंड: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ६ विकेटनी शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २०४ धावांचे आव्हान ठेवले होते. केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांच्या जोरावर भारताने विजय मिळवला. या सामन्यात काही विक्रमांची देखील नोंद झाली आहे. त्यावर एक नजर…

>> भारत-न्यूझीलंड यांच्या सामन्यात पाच फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये एका सामन्यात पाच फलंदाजांनी अर्धशतक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. न्यूझीलंडकडून कॉनिल मुन्रो, केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी तर भारताकडून केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतक केले. यातील टेलर आणि अय्यर हे दोन फलंदाज नाबाद राहिले.

>> एका टी-२० सामन्यात सर्वाधिक अर्धशतक करण्याचा विक्रम या पाच फलंदाजांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

वाचा-

>> पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडकडून विल्यम्सनने ४, रॉस टेलरने ३, कॉलिन मुन्रोने २ आणि मार्टिन गप्टिल १ असे मिळून १० षटकार मारले. तर भारतीय संघाने देखील १० षटकार मारले. यात राहुल आणि श्रेयस यांचे प्रत्येकी ३ तर रोहित, विराट, मनीष पांडे आणि शिवम दुबे यांच्या प्रत्येकी एका षटकाराचा समावेश आहे.

>> टी-२०मध्ये धावांचा पाठलाग करताना भारताने मिळवलेला हा तिसऱ्या क्रमांकाचा विजय ठरला. याआधी भारताने लंकेविरुद्ध २०७ तर वेस्ट इंडिजविरुद्ध २०८ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

वाचा-

>> टी-२०मध्ये २००हून अधिक धावा पाठलाग करून सर्वाधिक विजय भारतीय संघाने मिळवले आहेत. भारताने आतापर्यंत ४ वेळा अशी कामगिरी केली आहे. तर ऑस्ट्रेलियाने दोन वेळा. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश आणि कतार यांनी अशी कामगिरी प्रत्येकी एक वेळा केली आहे.

>> या सामन्यात न्यूझीलंडच्या इश सोधीने दोन विकेट घेतल्या. यासह त्याने टी-२० प्रकारात भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान मिळवले. त्याने पाकिस्तानच्या उमर गुलचा ११ विकेट घेण्याचा विक्रम मागे टाकला. सोधीने भारताविरुद्ध आतापर्यंत १३ विकेट घेतल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here