पॉटशेफस्ट्रूम (द. आफ्रिका):: १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी पराभव केला. टीम इंडियाने दिलेले २३४ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियन संघाला पेलवले नाही. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या आव्हानातील हवाच निघून गेली. ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या १५९ धावांत गारद झाला. भारताचा जलदगतीचा गोलंदाज कार्तिक त्यागी हा सामनावीराचा मानकरी ठरला. त्याने २४ धावांत ४ बळी टिपले.

उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. भारताच्या डावाची सुरुवात फारशी समाधानकारक झाली नाही. सलामीचा फलंदाज दिव्यांश सक्सेना १४ धावांवर तंबूत परतला. त्यावेळी भारताची धावसंख्या ३५ होती. त्यानंतर ठाराविक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने भारतीय संघासमोरील अडचणीत वाढ झाली. सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने एका बाजूने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. त्याने सर्वाधिक ६२ धावांची खेळी साकारली. जयस्वाल बाद झाल्यानंतर टीम इंडिया संकटात असताना सिद्धेश वीर आणि अथर्व अंकोलेकर यांनी डावाची धुरा हाती घेतली. सिद्धेश २५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रवि बिष्णोईने ३० धावांची खेळी साकारत अर्थवला चांगली साथ दिली. अथर्वने ५४ चेंडूत ५५ धावांची नाबाद खेळी साकारत टीम इंडियाची धावसंख्या २३३ पर्यंत पोहचवली.

भारतीय संघाने दिलेले २३४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. शून्य धावसंख्या असताना जॅक फ्रेझर धावचित झाला. त्यानंतर कार्तिक त्यागीने अफलातून गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाला जोरदार हादरे दिले. हॉर्वेला पायचीत बाद केल्यानंतर हेर्नेला त्रिफळाचित बाद केले. त्यावेळी कांगारुंची अवस्था तीन बाद चार धावा अशी केविलवाणी होती. ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या १७ असताना ऑलिव्हर डेव्हिसला झेलबाद झाला. पॅट्रीक व सलामीवीर फॅन्निंग यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कार्तिकने पुन्हा कमाल दाखवत पॅट्रीकला झेलबाद केले. सहाव्या विकेट्साठी स्कॉट आणि फॅन्निंग यांनी डावाला आकार देत धावसंख्या वाढवली. अखेर रवि बिष्णोईने ही जोडी फोडत टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग उघडला. ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना कमाल दाखवता आली नाही. आकाश सिंहने तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. कार्तिक त्यागीने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद केले. या धक्क्यातून कांगारुंचा युवा संघ सावरलाच नाही.

ऑस्ट्रेलियन संघाकडून फॅन्निंगने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. तर, भारताच्यावतीने कार्तिक त्यागीने २४ धावांत ४ बळी घेतले. आकाश सिंहने ३० धावात ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. तर, बिष्णोईने एक बळी टिपला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here