अशी झाली सुपर ओव्हर
>> पहिल्या चेंडूवर रोहित शर्माच्या दोन धावा
>> दुसऱ्या चेंडूवर रोहितची एक धाव
>> तिसऱ्या चेंडूवर राहुलचा चौकार
>> चौथ्या चेंडूवर राहुलची पुन्हा एक धाव
>> पाचव्या चेंडूवर रोहितचा षटकार, विजयासाठी १ चेंडूत ४ धावा
>> अखेरच्या चेंडूवर रोहितचा षटकार, भारत विजय
सुपर ओव्हरच्या आधी न्यूझीलंडला अखेरच्या षटकात ६ चेंडूत ९ धावा हव्या होत्या. सामना न्यूझीलंडने जवळ जवळ जिंकला होता. कारण केन विल्यम्सन आणि रॉस टेलर मैदानात होते. पण शमीने प्रथम विल्यम्सनला बाद केले. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर एक धाव हवी असताना शमीने टेलरला बाद केले. २० षटकात दोन्ही संघांच्या समान धावा झाल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
त्याआधी भारताने दिलेले १८० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीने ४७ धावा केल्या. शार्दुल ठाकूरने मार्टिन गप्टिलला ३७ धावांवर बाद केल. त्यानंतर रविंद्र जडेजाने कॉलिन मुन्रोला १४ धावांवर बाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. चहलने ११व्या षटकात मिशेल सँटनरची विकेट घेतली. पण एका बाजूला कर्णधार केन विल्यम्सन बाजू सांभाळली. शार्दुलने कॉलिन डी ग्रँडहोमला ५ धावांवर बाद करून न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. पण तोपर्यंत विल्यम्सने संघाला विजयाजवळ आणले होते. अखेर रॉस टेलरच्या मदतीने त्याने विजय साकार केला.
तिसऱ्या टी-२०त न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची शानदार सुरूवात करून दिली. पहिल्या दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा राहुल २७ धावांवर बाद झाला. त्यानंतर दरम्यान रोहितने टी-२०मधील अर्धशतक पूर्ण केले. पण राहुल पाठोपाठ रोहित देखील बाद झाला. त्याने ४० चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर प्रमोशन मिळालेल्या शिवम दुबेने निराशा केली. तो पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. यामुळे भारताची अवस्था ३ बाद ९६ अशी झाली.
दुबेच्या जागी आलेल्या श्रेयस अय्यर आणि विराट यांनी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. श्रेयसला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. तो १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट देखील ३८ धावा करून माघारी परतला. अखेरच्या षटकांत मनिष पांडे आणि रविंद्र जडेजा यांनी ११ चेंडूत २४ धावा केल्या. यामुळे भारताला १७९ धावांपर्यंत मजल मारता आली.
न्यूझीलंडकडून हॅमिश बेनेटने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. मिशेल सँटनर आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times