हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात सुपरओव्हरमध्ये रोहित शर्मानं तडकावलेल्या सलग दोन उत्तुंग षटकारांच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडवर ‘सुपरहिट’ विजय मिळवला. सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडनं भारताला १८ धावांचं आव्हान दिलं होतं. रोहित शर्मानं लागोपाठ दोन षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतानं मालिकाही खिशात घातली. भारताच्या या रोमहर्षक आणि ऐतिहासिक कामगिरीनंतर सोशल मीडियावरून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही भारताच्या या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या कामगिरीचं भरभरून कौतुक केलं आहे.
भारताचा माजी किक्रेटपटू वीरेंद्र सहवागनं तर ‘ऐसा लगता है, अपुनिच भगवान है’ हा ‘सिक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकाचा डायलॉग पोस्ट करत भारतीय संघाच्या विजयाचं कौतुक केलं आहे. ‘रोहित शर्मामुळेच आपण हा विजय मिळवू शकलो. त्याने अशक्य ते शक्य करून दाखवलं. मोहम्मद शमीने चार चेंडूत दोन धाव देऊन दोन गडी बाद केले, त्याची कामगिरीही अविश्वसनीयच होती. न्यूझीलंडविरोधातील भारताचा विजय हा अविस्मरणीयच आहे,’ असं सेहवागने म्हटलं आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांनीही भारताच्या विजयावर ट्विट केलं आहे. ‘इंडिया, इंडिया, इंडिया. सुपर ओव्हरमध्ये भन्नाट विजय मिळवला. न्यूझीलंडविरोधातील टी-२०चा तिसरा सामना. मालिकाही जिंकली. पहिल्यांदाच न्यूझीलंडने असं केलं. अभिनंदन. २ चेंडूत १० धावा हव्या होत्या आणि रोहितने सलग दोन षटकार लगावले. अविश्वसनीयच!,’ असं महानायक अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणनेही ‘आश्चर्यकारक विजय’ अशा शब्दात या विजयाचं वर्णन केलं. ‘शमीने चार चेंडूत दोन गडी बाद केले आणि सामन्याचं चित्रंच पालटलं. रोहित शर्मानेही पुन्हा एकदा तो जगातील सर्वात खतरनाक फलंदाज असल्याचं दाखवून दिलं. न्यूझीलंडविरोधातील हा सामना दीर्घकाळ स्मरणात राहील,’ असं लक्ष्मणने म्हटलं आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times