भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये प्रथमच टी-२० मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मालिकेतील एक सामना अद्याप बाकी असून हा सामना जिंकून मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा भारतीय संघाचा मानस आहे. आजच्या सामन्यानंतर बोलताना अर्थातच विराट मालिकेतील विजयी आघाडीपेक्षा गेल्या दोन सामन्यांवर दिलखुलासपणे बोलला.
‘भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लागोपाठ दोन सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. या सामन्यांतून मला दोन गोष्टी प्रामुख्याने शिकायला मिळाल्या. त्या म्हणजे प्रतिस्पर्धी संघ चांगला खेळत असेल तर तुम्ही शेवटपर्यंत विचलित न होता शांतचित्ताने खेळा आणि दुसरे म्हणजे संधी मिळताच त्याचे सोने करा’, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
मला विचाराल तर यापेक्षा रोमहर्षक सामना असू शकत नाही. सुपर ओव्हरमध्ये आम्ही जास्त खेळलो नाही. मात्र गेल्या दोन सामन्यांत आम्हाला त्याला सामोरे जावे लागले आणि दोन्हीवेळा आम्ही यशस्वी झालो. हे दोन्ही विजय संघाचे मनोबल वाढवणारे आहेत, असे विराटने सांगितले.
राहुलसोबत सॅमसन जाणार होता…
संजू सॅमसनला आजच्या सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र सलामीला पाठवूनही तो फारशी चमक दाखवू शकला नाही. सॅमसनबाबत विचारले असता विराटने खास गुपित उघड केले. खरेतर सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी के. एल. राहुलसोबत संजू सॅमसनला पाठवण्याचा विचार मी करत होतो. मात्र, मीच फलंदाजीला उतरायला हवे, असा आग्रह राहुलने धरला आणि मग निर्णय बदलला, असे विराट म्हणाला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times