बांगलादेशने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडच्या युवा संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ८ बाद २११ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बेकहॅम व्हीलर -ग्रीनलने सर्वाधिक ७५ धांवाची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याशिवाय निकोलस लिडस्टोनने ४४ धावा, फर्ग्युस लॅलमॅनने २४ धावांची खेळी केली. इतर कोणताही किवी फलंदाज बांगलादेशच्या गोलंदाजांचा मुकाबला करू शकला नाही. बांगलादेशकडून शोरफिर इस्लाम हा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४५ धावांत ३ गडी बाद केले. तर, शमीम हुसैन, हसन मुरादने प्रत्येकी दोन गडी बाद केले. रकीबुल हसननेदेखील एक गडी बाद केला.
न्यूझीलंडने दिलेले २१२ धावांचे आव्हान बांगलादेशने दमदार फलंदाजीच्या जोरावर सहज पार केले. बांगलादेशचे पहिले दोन गडी झटपट बाद झाले. मात्र, त्यानंतर महमूद हसन जॉय आणि तौहीद हृदॉयने डाव सांभाळला. महमूद हसन जॉयने १२७ धावांत १०० धावांची शतकी खेळी साकारली. तर, तौहीदने ४७ चेंडूत ४० धावा करत त्याला छान साथ दिली. त्याशिवाय शहादत हुसैनने ५१ चेंडूत ४० धावांची खेळी साकारली.
अंतिम फेरीत बांगलादेशसमोर आता भारतीय संघाचे आव्हान असणार आहे. रविवारी ९ फेब्रुवारी रोजी अंतिम फेरी होणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times