१९९९ साली पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. दोन्ही संघादरम्यान दुसरा कसोटी सामना दिल्लीत झाला. भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात एकट्याने सर्वांना बाद केले. भारत-पाक यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईत झाला होता. त्या सामन्यात पाकिस्तानने १२ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.
वाचा-
दिल्ली कसोटी सामन्याआधी चेन्नईत झालेल्या सामन्यात चौथ्या डावात भारताला २७१ धावांचे आव्हान मिळाले होते. सचिन तेंडुलकरने १३६ धावांची खेळी केली होती. पण भारतीय संघाला विजयासाठी १७ धावांची गरज असताना सचिन वासिम अक्रमच्या चेंडूवर बाद झाला. तेव्हा भारताकडे तीन विकेट होत्या आणि विजयासाठी १७ धावांची गरज होती. सचिन बाद झाल्यानंतर ४ धावात भारताच्या ३ विकेट गेल्या. त्यामुळे दिल्ली कसोटीत विजय मिळवणे भारतीय संघासाठी गरजेचे होते.
दुसऱ्या कसोटीत मोहम्मद अझरुद्दीनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या. तर पाकिस्तानला १७२ धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात भारताने ३३९ धावा केल्या आणि पाकला विजयासाठी ४२० धावांचे लक्ष्य दिले. दुसऱ्या डावात शाहिद आफ्रिदी आणि सईद अन्वर यांनी दमदार सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १०१ धावांची भागिदारी केली. ही जोडी अनिल कुंबळेने फोडली आणि त्यानंतर सुरु झाला एका विक्रमी कामगिरीचा प्रवास…
वाचा-
कुंबळेने एका पाठोपाठ एक फलंदाजांना बाद करत पाकिस्तानचा २०७ वर ऑल आऊट केला आणि भारतीय संघाला २१२ धावांनी विजय मिळून दिला. तसेच मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
अशी होती कुंबळेची कामगिरी
कुंबळेने पहिल्या डावात २४.३ षटकात ७५ धावा देत ४ विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात २६.३ षटकात ७४ धावा देत १० विकेट घेतल्या. सामन्यात एकूण १४ विकेट घेणाऱ्या कुंबळेला सामनावीर पुरस्कार मिळाला.
वाचा-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त दोन गोलंदजांनी विरोधी संघाच्या एका डावात १० विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. कुंबळेच्या आधी २६ जुलै १९५६ रोजी इंग्लंडचा गोलंदाज जिम लॅकर याने ऑस्ट्रेलियाच्या १० फलंदाजांना बाद केले होते. आशियाई गोलंदाजांमध्ये फक्त कुंबळेने १० विकेट घेतल्या आहेत. अन्य गोलंदाजांनी ९ किंवा ८ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. पण १० विकेट घेणारा कुंबळे हा एकमेव गोलंदाज आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times