माऊन्ट माँगनुई
गोलंदाजांचा स्वैर, निष्रभ मारा, क्षेत्ररक्षकांच्या ‘डुलक्या’ यामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत वरचढ होण्याची संधी गमावली. गोलंदाज, पराभवाला कारण ठरल्याचे सांगत विराटने नाराजी व्यक्त केली. तब्बल तीन दशकांनंतर भारतावर वनडे मालिकेतील सगळ्याच लढती गमावण्याची आफत आली. भारताचा हुकूमी तेज जसप्रीत बुमराहला संपूर्ण मालिकेत एकही विकेट टिपता आली नाही, यावरूनच त्याचे आणि ओघाने प्रत्येक गोलंदाजाचे अपयश अधोरेखित होते आहे. जिथे बुमराहची ही गत तिथे शार्दूल ठाकूरकडून काय अपेक्षा करणार? त्यालाही न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चोपून काढलेच.

-या चुका…

‘ आम्ही ०-३ अशी गमावल्याचे दिसत असले, तरी हे अपयश तितके कटू नाही. आम्ही मिळालेल्या पुरेशा संधी सत्कारणी लावल्या असत्या तर मालिकेचे चित्र भारताच्या बाजूने दिसले असते. अशा हातातल्या संधी गमावल्या तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सामने जिंकता येत नाहीत. संधी गमावल्यात तर तुम्ही जिंकण्यासच लायकच नसता’, विराट कोहलीने सामना आटोपल्यानंतर पार पडलेल्या बक्षिस समारंभाच्यावेळी आपल्या सहकाऱ्यांनाच एकप्रकारे सुनावले आहे. विराटने आपले गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुकांवर थेट बोट ठेवले. ‘गोलंदाजांना ब्रेकथ्रू मिळवून देताच आले नाहीत. क्षेत्ररक्षण तर सुमारच झाले’, असे विराटने नमूद केले.

‘फलंदाजांनी प्रतिकूल परिस्थितीत डावाला आकार देत धावा केल्या. जे या पराभवातून हाती लागलेले सकारात्मक आहे. मात्र गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आम्ही चुकलो आणि मालिका गमावली’, असे म्हणत विराटने गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या अपयशाचा आवर्जून उल्लेख केला.

-लक्ष कसोटीवर
येत्या २१ फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मध्ये दहा दिवसांची विश्रांती असेल. कसोटी मालिकेबद्दल विराट म्हणतो, ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे आता प्रत्येक कसोटी महत्त्वाची ठरणार आहे. भारताचा कसोटी संघ समतोल असून मला वाटते की आम्ही न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका नक्कीच जिंकू. अर्थात त्यासाठी मैदानात योग्य दृष्टिकोनासह उतरायला हवे’. विराट ‘योग्य दृष्टिकोन’ हे विशेषण जाणीवपूर्वक वापरत आपल्या सहकाऱ्यांना योग्य तो संदेश देतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here