सिडनी: पूनम यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. पण गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा ११५ धावांवर ऑल आऊट केला.

भारताने दिलेल्या १३३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. शिखा पांडेने बेथ मुनीची विकेट घेत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने मेग लॅर्निंगची विकेट घेत दुसरा धक्का दिला. त्यानंतर फिरकीपटू पूनम यादवने अलिसा हिलीची विकेट घेत भारताला तिसरे यश मिळवून दिले. १२व्या षटकात पूनमने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेत ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन धक्के दिले. पूनमला हॅटट्रिकची संधी होती पण पाचव्या चेंडूवर कॅच सुटला.

हॅटट्रिक हुकल्यानंतरच्या पुढच्या ओव्हरमध्ये पूनमने जेस जोनासेनला बाद करत ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट घेतली. त्या पाठोपाठ शिखाने सदरलँडला बाद करत भारताला आणखी एक यश मिळून दिले. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ६ चेंडूत २१ धावांची गरज होती. भारतीय संघाने अखेरच्या दोघा फलंदाजांना धावबाद केले आणि १७ धावांनी विजय मिळवला.

भारताकडून पूनमने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. शिखाने २ तर राजेश्वरीने एक विकेट घेतली. त्याआधी भारताने दीप्ती शर्माच्या नाबाद ४९ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here