पर्थ: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा विजयी धडाका सुरूच आहे. भारताने आज बांगलादेशला १८ धावांनी मात देत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यातही पूनम यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवत बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. सोळा वर्षीय सलामीवीर शेफाली वर्मा आजच्या सामन्याची मानकरी ठरली. शेफालीने १७ चेंडूत ३९ धावांची तडाखेबंद खेळी केली.

भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १४२ धावा करत बांगलादेशपुढे विजयासाठी १४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ८ बाद १२४ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

भारताकडून पूनम यादवने ४ षटकांत १८ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स घेतल्या तर शिखा पांडे आणि अरुंधती रेड्डीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारताने सलामीच्या लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता.

शेफालीची फटकेबाजी

बांगलादेशने आज नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारताला शेफाली वर्माने पुन्हा एकदा जबरदस्त सुरुवात करून दिली. तान्या भाटियाच्या रूपाने भारताला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला मात्र शेफालीने आक्रमक खेळी करत बांगलादेशच्या गोलंदाजीची पिसं काढली. ५ षटकांत भारताने १ बाद ४७ धावांपर्यंत मजल मारली. त्यात शेफालीचे ३१ धावांचे योगदान होते. शेफाली १७ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३९ धावा करून बाद झाली. शेफालीच्या ३९ धावा आणि जेमिमा रॉड्रिगेजच्या ३४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ६ बाद १४२ धावा केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here