मेलबर्न: आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. गुरूवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने ४ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने याआधी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांचा पराभव केला होता. या विजयासह भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. स्पर्धेत सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा भारत हा पहिला संघ आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडला विजयासाठी १३४ धावांचे आव्हान दिले होते. भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखले होते आणि ठराविक अंतराने विकेट घेतल्या. शिखा पांडेने रचेल प्राएस्टची विकेट घेत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर दीप्ती शर्माने सुझी बेट्सला ११ धावांवर बाद करत दुसरी विकेट घेतली. फिरकीपटू पूनम यादवने कर्णधार सोफी डिव्हाइनला बाद करत भारताला मोठा ब्रेक मिळवून दिला.

वाचा-
सोफी बाद झाल्यानंतर मॅडी ग्रीन आणि कॅटी मार्टिन यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. पण राजेश्वरी गायकवाडने ग्रीनला २४ धावांवर बाद करत भारताला ब्रेक मिळवून दिला. त्यानंतर राधा यादवने कॅटीची विकेट घेतली आणि न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला.

अखेरच्या षटकात अमेलिया केर आणि हेली जेन्सन यांनी विजयासाठी प्रयत्न केले. २०व्या षटकात न्यूझीलंडला ६ चेंडूत १६ धावांची गरज होती पण शिखा पांडेने ११ धावा दिल्या आणि संघाला ४ धावांनी विजय मिळवून दिला. भारताकडून शिखा, दीप्ती, राजेश्वरी, पूनम आणि राधा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

त्याआधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरूवात फार समाधानकारक झाली नाही. स्मृती मानधना पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरली. ती ११ धावांवर बाद झाली. त्यानंतर शफाली शर्मा आणि तानिया भाटिया यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची अर्धशतकी भागिदारी केली. तानिला २३ धावांवर बाद करत रोझमेरी मेयरने भारताला दुसरा धक्का दिला. त्या पाठोपाठ कर्णधार हरमनप्रीत कौर १ धाव करून माघारी परतली.

भारताच्या विकेट एका बाजूने पडत असताना शफालीने दुसरी बाजू लावून धरली होती. शफाली अर्धशतक करेल असे वाटत असताना अमेलिया केरने तिला ४६ धावांवर बाद केले. शफाली बाद झाली तेव्हा भारताची अवस्था १३.५ षटकात ५ बाद ९५ अशी होती. त्यानंतर २० षटकात भारताला ८ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारता आली.

न्यूझीलंडकडून केर आणि मेयरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here