ही घटना मंगळवारी (१२ ऑक्टोबर) घडली. हजरत ट्वीकेनहॅम मैदानावर खेळत होता. त्यावेळी अचानक कोणीतरी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्याच्या नाकातूनही रक्त येऊ लागले. जखमी अवस्थेत त्याने आपल्या मित्राला विचारले की, त्याच्यावर हल्ला का झाला? घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका शिक्षकाने हजरतला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. हजरतने आपल्या शिक्षकालाही त्याच्यावर कोणी हल्ला केला? हे विचारले. पण, त्याला या प्रश्नांची उत्तरे कळण्यापूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतला.
क्रिकेटपटू होण्यासाठी गाठलं लंडन
क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजरतने वयाच्या १२ व्या वर्षी अफगाणिस्तान सोडले. त्याच्यासोबत त्याचा जुळा भाऊही होता. ते व्हिएन्ना मार्गे तुर्की, बल्गेरिया असा प्रवास करत लंडनला पोहोचले. लंडनमध्ये राहणाऱ्या हजरतच्या चुलत भावानेही युरोपियन युनियनच्या डब्लिन कन्व्हेन्शनच्या मदतीने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. हजरतच्या मृत्यूनंतर त्याचा चुलत भाऊ साहित कोचे म्हणाला, ‘चांगलं जीवन जगण्यासाठी तो इथे आला होता. शिक्षण घेत त्याला क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे होते. त्याला एमएमएमध्ये जायचे होते, पण पायाच्या दुखापतीनंतर त्याने संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित करण्यास सुरुवात केली. तो एक चांगला खेळाडू होता.”
घटनेची पालकांना नाही माहिती
साहित पुढे म्हणाला की, ‘आयुष्यातील अत्यंत वाईट टप्प्यातून तो गेला होता, पण तो खूप धैर्यवान होता. मी त्याला माझा भाऊ नाही, तर माझा जवळचा मित्र मानतो. कधीही कोणत्याही वेळी मी त्याच्याकडे मदतीसाठी जात असे.’ हजरतचे आई-वडील अफगाणिस्तानमधील एका छोट्या गावात राहतात. त्यांना आपल्या मुलाच्या हत्येबद्दल अजूनही काही माहिती नाही. हजरतचे भाऊ त्याचा मृतदेह घेऊन अफगाणिस्तानला जाण्याची वाट पाहत आहेत. कारण अशा प्रकारे ते हजरतच्या पालकांना याबद्दल सांगू शकतात.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times