सिडनी: आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. सिडनी मैदानावर सकाळापासून पावसाची हजेरी होती. सामना सुरू होण्यासाठी अखेरची वेळ ११.०६ मिनिटे ही होती. पण पावसामुळे नाणेफेक देखील होऊ शकली नाही. यामुळे भारतीय संघाने ग्रुप फेरीतील गुणांच्या आधारे अंतिम फेरीत प्रवेश केला.

ग्रुप ए मध्ये असलेल्या भारतीय संघाने ८ गुणांसह अव्वल स्थान मिळवले होते. ग्रुप बी मध्ये इंग्लंडचा संघ ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. आयसीसीच्या नियमानुसार गट फेरीतील गुणांच्या आधारे भारत अंतिम फेरीत दाखल झाला. भारतीय महिला संघाची आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी भारत २००९, २०१० आणि २०१८ मध्ये उपांत्य फेरीत दाखल झाला होता. गेल्या म्हणजे २०१८च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा पराभव केला होता.

याच मैदानावर दुपारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य फेरीतील दुसरी लढत होणार आहे. ही लढत देखील पावसामुळे रद्द झाल्यास ग्रुप फेरीतील गुणांच्या आधारे आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. जर सामना झाला तर विजेता संघ आठ मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारताविरुद्ध विजेतेपदासाठी लढेल. सामना रद्द झाल्यास किंवा आफ्रिकेने विजय मिळवल्यास ते प्रथमच अंतिम फेरीत दाखल होतील. याआधी आफ्रिकेचा संघ २०१४ मध्ये उपांत्य फेरीत पोहोचला होता.

भारतीय वेळेनुसार आठ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता अंतिम सामन्याला सुरूवात होईल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here