भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १२ मार्चला धरमशाला येथे होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना १५ मार्चला लखनौ येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना १८ मार्चला कोलकाता येथील इडन गार्डन्स येथे रंगणार आहे.
न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिका गमावल्यावर कोहलीवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यानंतर कसोटी मालिकेतील पराभवानंतर कोहली ट्रोल व्हायला लागला होता. आता कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे कोहलीला सध्या या मालिकेपासून दूर ठेवण्याचा विचार निवड समिती करत असेल, असे म्हटले जात आहे. कारण या तीन एकदिवसीय सामन्यांनंतर जवळपास दीड महिने आंतरराष्ट्रीय सामना होणार नाही. तोपर्यंत चाहते कोहलीच्या ही पराभवाची मालिका विसरतील, असे निवड समितीला वाटत असल्याचे टीकाकारांना वाटत आहे.
काही दिवसांपूर्वी कोहलीने अतिक्रिकेटबाबतही भाष्य केले होते. त्यामुळे आता त्याचा फॉर्म आणि अतिताण पाहता, त्याला क्रिकेटपासून लांब ठेवण्याचा विचार निवड समिती करत असल्याचे काही जणांना वाटत आहे. त्यामुळे या मालिकेतासाठी कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय निवड समिती घेऊ शकते, असे म्हटले जात आहे.
जर कोहलीला विश्रांती दिली आणि उपकर्णधार रोहित शर्माही दुखापतीमुळे संघाबाहेर असेल, तर कर्णधार नेमके कोणाला करायचे, हा प्रश्न निवड समितीपुढे असेल. पण या प्रश्नाचे उत्तरही निवड समितीकडे असल्याचे म्हटले जात आहे. कारण न्यूझीलंडमध्ये कोहली खेळत नसताना काही वेळा लोकेश राहुलने संघाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे या मालिकेसाठी संघाची कमान राहुलवर सोपवण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times