सचिन आणि सेहवाग या जोडीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगलाच दबदबा होता. सचिन आणि सेहवाग या जोडीने भल्या भल्या गोलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले होते. या दोघांच्या फलंदाजीमध्ये नजाकत होती आणि तीच चाहत्यांना मंत्रमुग्ध करत होती. पण हे दोघे भारतीय संघातून बाहेर पडल्यावर त्यांना फार कमीवेळा एकत्रित पाहिले गेले आहे.
आज भारताचा वेस्ट इंडिजबरोबरचा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. त्यामुळे सचिन आणि वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लारा हे दोघे बऱ्याच वर्षांनी एकमेकासमोर उभे ठाकलेले पाहायला मिळणार आहेत.
शनिवारी मुंबईचे सर्व रस्ते वानखेडेच्या दिशेने जात आसल्याचे पाहायला मिळेल. कारण आज वानखेडेवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यांमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2020 मधील पहिला सामना खेळला जाणार आहे. यावेळी इंडिया लिजेंड्स संघात सचिन आणि वेस्ट इंडिज लिजेंड्स संघात लारा खेळणार आहे. या मालिकेमध्ये पाच देशांचे दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहे. यामध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यासह श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका हे देश सहभागी होणार आहेत.
सचिनसाठी आजचा सामना फारच भावुक असेल. कारण सचिन नोव्हेंबर २०१३ साली अखेरचा वानखेडेवर सामना खेळण्यासाठी उतरला होती. हा सचिनचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि त्यावेळीही प्रतिस्पर्धी संघ हा वेस्ट इंडिजचाच होता. हा कसोटी सामना भारतानेच जिंकला होता आणि सचिनला विजयानिशी निरोप दिला होता. पण आता जवळपास सात वर्षांनी सचिन पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियम उतरणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. यावेळी सचिनबरोबर सेहवागही असणार आहे. त्यामुळे ही जोडी आता किती धावा करते, हे पाहणे सर्वांसाठी उत्सुकतेचे असेल.
रोड सेफ्टीबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी ही मालिका खेळवण्यात येत आहे. भारतामध्ये रस्त्यावरील अपघातामध्ये चार मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे लोकांना याबाबत जागरूक करण्यासाठी ही मालिका खेळवली जाणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times