मेलबर्न: भारतीय महिला क्रिकेट संघासाठी रविवारचा दिवस मोठ्या आव्हानांचा ठरणार आहे. ८ मार्च या जागतिक महिला दिनी भारतीय महिला संघ टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणता चमत्कार करून दाखवतो याची तमाम क्रिकेटचाहत्यांना प्रतीक्षा आहे. यजमान ऑस्ट्रेलियाचा अडथळा दूर करून विजेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज आहे.

या स्पर्धेच्या साखळीत भारताने सर्व लढती जिंकत अव्वलस्थान पटकाविले होते. त्यात सलामीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली होती. त्यामुळे भारतीय संघ विजेतेपदासाठी एक वेगळा आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी जमेची बाजू आहे ती त्यांनी चारवेळा जिंकलेले विजेतेपद आणि घरच्या मैदानातील लोकांचा पाठिंबा.

भारताला एक गोष्ट सतावत आहे ती, जवळपास आठवड्याभराने भारतीय संघ थेट अंतिम फेरीत खेळत आहे. इंग्लंडविरुद्धची उपांत्य झुंज पावसामुळे वाया गेल्याने भारताला या कालावधीत खेळायलाच मिळालेले नाही. भारताच्या आशा काही प्रमुख खेळाडूंवर आहेत. त्यात तडाखेबंद फलंदाज शेफाली वर्मा आघाडीवर आहे. १६ वर्षीय शेफाली ही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे प्रमुख लक्ष्य असेल. पण, दुसरीकडे भारताच्या फिरकी आक्रमणाची चिंताही कांगारुंना आहे. या फिरकी गोलंदाजांमुळे भारताला या स्पर्धेत बहुतांश यश मिळालेले आहे. शफालीसह स्मृती मानधना व हरमनप्रीत यांच्यावरही भारताची मदार असेल. भारताच्या मधल्या फळीलाही पुरेसे योगदान द्यावे लागेल.

याआधी, तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला नमविले होते. त्यातच ते घरच्या मैदानावर खेळत आहेत. सात वर्ल्ड कप स्पर्धांपैकी सहामध्ये ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे या घडीला भारताला विजेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा मोठा अडथळा ओलांडावा लागेल. भारतीय संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या प्रतिस्पर्ध्यांसमोर उभारावी लागेल. याआधीच्या लढतींवर नजर टाकली तर भारताला १५०पेक्षा अधिक धावा करता आलेल्या नाहीत. तरीही भारताने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. त्याला शिस्तबद्ध गोलंदाजी कारणीभूत आहे.

लेगस्पिनर पूनम यादवने बोटाच्या दुखापतीतून सावरत जबरदस्त पुनरागमन केले आहे. स्पर्धेत तिने सर्वाधिक ९ बळी मिळविले आहेत. ऑस्ट्रेलियाची मेगन स्कूटही आघाडीवर आहे. वेगवान गोलंदाज शिखा पांडेनेही प्रभाव पाडला आहे. तर डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादव व राजेश्वरी गायकवाड यांच्याकडेही लक्ष असेल. स्पर्धेच्या सलामीलाच पूनम यादवने ऑस्ट्रेलियन फलंदाजीला जखडून टाकले होते. तिचा सामना अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन कसा करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

७५ हजार तिकिटांची विक्री

या सामन्यासाठी ७५ हजार तिकिटे आधीच विकली गेली आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ती संख्या कदाचित ९० हजारापर्यंत वाढू शकेल.

ऑस्ट्रेलियाचे पारडे जड

घरच्या मैदानावर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाचे पारडे काहीसे जड आहे. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा या संघाला मिळणार आहे. मात्र. भारतीय चाहतेही मोठ्या संख्येने इथे आहेत. ऑस्ट्रेलियाला वेगवान गोलंदाज टायला व्लेमिन्क व अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी यांची अनुपस्थिती जाणवणार आहे. दोघीही दुखापतीमुळे खेळणार नाहीत.

स्टार्कही पत्नीसाठी उपस्थित

या संघातील खेळाडू अॅलिसा हिली हिला प्रोत्साहन देण्यासाठी तिचा पती आणि ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही उपस्थित राहणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. मात्र स्टार्कने या अंतिम सामन्यासाठी परवानगी घेतली आहे.

दृष्टिक्षेप…

– भारतीय महिला संघाने प्रथमच टी-२० वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली असून, भारतीय संघासमोर चार वेळा जगज्जेतेपद पटकाविणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे.

– सहाव्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत एकदाच उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. २०१६च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला आठ विकेटनी हरवून जेतेपद पटकावले होते.

– आतापर्यंत तीनच संघांनी महिला टी-२० वर्ल्ड कप उंचावला आहे. ऑस्ट्रेलियाने चार वेळा (२०१०, १२, १४ आणि २०१८), तर इंग्लंड (२००९) आणि वेस्ट इंडिज (२०१६) या संघांनी प्रत्येकी एकदा वर्ल्ड कप उंचावला आहे.

– आतापर्यंतच्या महिला टी-२० वर्ल्ड कपच्या सहापैकी दोन अंतिम लढतींत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी बाजी मारली आहे.

खेळ आकड्यांचा…

१४९ – २०१६ महिला टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम लढतीत वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ षटकांत २ बाद १४९ धावा करून जेतेपद पटकावले होते. आतापर्यंत झालेल्या महिला टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम लढतींतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

८५ – २००९ महिला टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडचा डाव ८५ धावांत गुंडाळला होता. ही महिला टी-२० वर्ल्ड कपमधील आतापर्यंतची नीचांकी धावसंख्या आहे.

१९४ – महिला टी-२० वर्ल्ड कपमधील भारताची सर्वोच्च धावसंख्या. २०१८ वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध ५ बाद १९४ धावा केल्या होत्या.

१६७ – महिला टी-२० वर्ल्ड कपमधील भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या. २०१८ वर्ल्ड कपमध्ये प्रॉव्हिडन्स येथे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ बाद १६७ धावा केल्या होत्या.

१२३ – महिला टी-२० वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्धची नीचांकी धावसंख्या. २०१० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध ३ बाद १२३ धावा केल्या होत्या.

१९१ – महिला टी-२० वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्या. २०१४ वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने आयर्लंडविरुद्ध ४ बाद १९१ धावा केल्या होत्या.

२ – महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया हे संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी दोनदा बाजी मारली आहे.

महिला टी-२० वर्ल्ड कप अंतिम सामना

भारत वि. ऑस्ट्रेलिया

वेळ: दुपारी १२.३० पासून

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here