: नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत जे घडले ते विसरून आता पुढे जावे लागणार आहे. आता सर्वांचे लक्ष न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानांवर होणाऱ्या टी-२० मालिकेकडे लागले आहे, ज्यासाठी मंगळवारी (९ नोव्हेंबर) टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या मालिकेत टीम इंडियाच्या ७ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.

विश्रांती दिल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, के.एल. राहुल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि ऋषभ पंत यांची नावे आघाडीवर आहेत. १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना जयपूर येथे होणार आहे. न्यूझीलंड मालिकेपासून टी-२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले जाऊ शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी हार्दिक पंड्याची निवड होऊ शकत नाही. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्याला संघातून वगळले जाऊ शकते. त्याला विश्रांती दिली जाणार नाही. निवडकर्ते पंड्याच्या जागी व्यंकटेश अय्यरला संधी देऊ शकतात. आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धानंतर सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अय्यर चांगली कामगिरी करत आहे. फिरकी विभागात वरुण चक्रवर्ती, राहुल चहर आणि अक्षर पटेल हे त्रिकूट संघात कायम राहिल असे दिसते.

फलंदाजांमध्ये महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडचं नाव आघाडीवर असून त्याची संघात निवड होणार आहे. तसेच ईशान किशन आणि मधल्या फळीत श्रेयस अय्यर हेदेखील संघात आपले स्थान पक्के करताना दिसून शकतील. वेगवान गोलंदाजीतील जोडगोळी शमी आणि बुमराहला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे गोलंदाजीची कमान दीपक चहर, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्याकडे असेल. जयपूरमध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना झाल्यानंतर दुसरा सामना रांचीमध्ये आणि तिसरा सामना कोलकातामध्ये खेळवला जाईल. यानंतर २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे या मालिकेत कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here