महाराष्ट्राचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधवचे करिअर धोक्यात आल्याचे दिसत आहे. कारण सध्याच्या घडीला केदारला बीसीसीआयने बाहेरचा रस्ता दाखवल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता यापुढे केदराचे काय होणार, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
केदारने २०१४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ७३ वनडे सामने खेळले आहेत, यापैकी ५२ डावांमध्ये त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली असून त्याने १३८९ धावा केल्या आहे. या ५२ धावांमध्ये फलंदाजी करताना केदारची सरासरी ४२.०९ एवढी असून स्ट्राइक रेट १०१.६१ आहे, यामध्ये दोन शतकांसह सहा अर्धशतकांचा समावेश आहे. पण सध्याच्या घडीला केदारचा फॉर्म चांगलाच नसल्याचे दिसत आहे. केदार हा चांगली कामचलाऊ गोलंदाजीही करतो, पण विराट कोहलीने केदारला गोलंदाजीची जास्त संधी दिली नाही. त्याचबरोबर त्याच्या सहाव्या क्रमांकावर कोहलीने मनीष पांडेला संधी दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
बीसीसीआयच्या निवड समितीने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला. सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच भारताचा संघ निवडण्यात आला होता. या संघामध्ये केदारला स्थान देण्यात आलेले नाही. यंदाच्या वर्षात जास्तीत जास्त ट्वेन्टी-२० सामने होणार आहेत, पण केदार हा ट्वेन्टी-२० संघात नाही. त्याचबरोबर केदार आता २६ मार्चला ३५ वर्षांचा होणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी पाहता केदारचे करिअर धोक्यात आले आहे, असे म्हटले जात आहे.
आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्माच्या जागी पृथ्वी शॉचा संघात समावेश करण्यात आला आहे. रोहितला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच बरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्या आणि जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. हार्दिकला न्यूझीलंड दौऱ्यात संघात संधी मिळाली असती पण तो फिट नसल्याने त्याला दौरा मुकावा लागला. भुवनेश्वर वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत जखमी झाला होता. त्यानंतर उपचारासाठी तो लंडनला गेला होता. त्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

असा आहे भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.

अशी आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
पहिली वनडे- १२ मार्च धर्मशाळा
दुसरी वनडे- १५ मार्च लखनऊ
तिसरी वनडे- १८ मार्च कोलकाता

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here