भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला १२ मार्चला सुरुवात होणार आहे. भारतामध्ये सध्याच्या घडीला करोना वायरसचे ४२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आफ्रिकेच्या संघाने भारतामध्ये येताना एक मोठे पाऊल उचलले आहे.
भारत आणि आफ्रिकेमध्ये १२ मार्चला पहिला सामना धरमशाला येथे होणार आहे. त्यानंतर १५ मार्चाला दुसरा सामना लखनौ येथे होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील अखेरचा सामना १८ मार्चला कोलकाता येथील इडन गार्डन्स येथे होणार आहे.
या करोना वायरसमुळे द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय खेळाडूंबरोबर हस्तांदोलन करण्यास नकार दिला आहे. याबाबत द. आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सांगितले की, ” भारतात करोनाचा प्रदुर्भाव झाला आहे. त्यामुळे आम्ही करोनापासून लांब रहण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी आम्ही लोकांबरोबर दोन हात लांब राहण्याचा विचार करत आहोत. खेळाडूंनी हस्तांदोलन टाळणे हा याच गोष्टीचा एक भाग आहे.”
भारतामध्ये सध्या ‘करोना’चा थोड्या प्रमाणात प्रदुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतामध्ये सध्याच्या घडीला करोना वायरसचे ४२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेली आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार सुरु आहे. कोरोना वायरस रोखण्यासाठी आता आयपीएल एक वेगळीच शक्कल लढवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ही शक्कल जर यशस्वी ठरली तर आयपीएल सुनियोजित वेळेत होऊ शकते, असे आयपीएलच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.
आयपीएल पुढे ढकलली तर बीसीसीआयला मोठे नुकसान होऊ शकते आणि बीसीसीआयला ते होऊ द्यायचे नाही. त्यामुळे आयपीएल सुनियोजित वेळेत कशी करायची, याचा विचार बीसीसीआयमधील चाणक्यांनी केला आहे. आयपीएल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजारोंच्या पटीने प्रेक्षक जमतात आणि त्यामुळे कोरोना वायरसचा प्रसार होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. या कारणांमुळेच आयपीएल पुढे ढकलण्याचा विचार आरोग्य मंत्री करत आहेत. पण बीसीसीआयने आता एक शक्कल लढवली आहे. आयपीएलचे सामने ते वेळेनुसारच आयोजित करणार आहेत, पण या सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एंट्री दिली जाणार नाही, असे केल्यास आयपीएल पुढे ढकलण्याची वेळ येऊ शकत नाही, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.
करोना वायरसने सावट सध्याच्या घडीला जगभरात पसरले आहे. त्यामुळे या गोष्टीचा फटका आता भारतामधील गर्भश्रीमंत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगलाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोना वायरसमुळे यंदाची आयपीएल पुढे ढकलली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
करोना वायरसमुळे आयपीएल पुढे ढकलणार का, याबाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, ” करोना वायरसमुळे मोठे मोठे कार्यक्रम रद्द होताना दिसत आहेत. आपणा सर्वांसाठी माणूस हा फार महत्वाचा आहे. बरीच माणंस एकत्र आली तर हा वायरस जास्त प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे जिथे जास्त लोकं एकत्र येतील, असे कार्यक्रम आपल्याला टाळायला हवेत. त्यामुळे आयपीएल ही स्पर्धा पुढे ढकलण्याची चर्चा किंवा याबाबतचा निर्णय होऊ शकतो.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times