धोनीने भारताला आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकवून दिल्या. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीही पटकावली आणि २०११ साली वनडे विश्वचषकाला गवसणी घातली. त्यामुळे धोनीचा अनुभव नेहमीच भारतीय संघासाठी मोलाचा ठरतो.
सध्याच्या घडीला बीसीसीआयने धोनीपुढे संघात पुनरागमन करण्यासाठी एक अट ठेवली आहे. या अटीनुसार धोनी सध्या आपली तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनी, बीसीसीआय, निवड समिती, कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यामध्ये एक गोष्ट निश्चित ठरली आहे. जर धोनीला भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करायला हवी. जर दोनीला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही तर त्याच्यासाटी भारतीय संघाचे दरवाजे जवळपास बंद होऊ शकतील.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. धोनीच्या जागी संघात स्थान देण्यात आलेला रिषभ पंतही आता बऱ्याच वेळा नापास झालेला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात पंतला खेळवायचे का, हा प्रश्न आता भारतीय निवड समितीपुढे नक्कीच आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाने ट्वेन्टी-२० सामन्यात लोकेश राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. पण तो कामचलाऊ यष्टीरक्षक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी धोनीला संधी द्यावी, असे काही माजी क्रिकेटपटूंनाही वाटत आहे.
काही दिवसांपूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, ” धोनीने भारतीय क्रिकेटसाठी भरपूर काही केले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे मोठे योगदान आहे. तो सध्या संघात नाही. पण आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात तो आपल्याला दिसू शकतो. यासाठी धोनीची आयपीएलमध्ये कशी कामगिरी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times