दुबई: टी-२० विश्वचषक २०२१ विजेत्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचने संघातील खेळाडूंचे कौतुक केले आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या शानदार कामगिरीवर त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हेजलवुडच्या या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय त्याने आयपीएलसहीत महेंद्रसिंग धोनीला दिले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जोश हेझलवूडने शानदार कामगिरी केली. त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त १६ धावा देत तीन बळी घेतले. यापूर्वी आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएल २०२१ मध्ये हेजलवूडने ९ सामन्यात ११ विकेट घेतल्या होत्या.

हेझलवूडच्या यशाचे श्रेय आयपीएलला
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत अॅरॉन फिंचने जोश हेझलवूडच्या यशाचे कारण सांगितले. तो म्हणाला की, हेझलवूडने चेन्नई सुपर किंग्जचा अनुभव ऑस्ट्रेलियन संघासोबत शेअर केला आणि त्याचा संघाला खूप फायदा झाला. फिंचच्या म्हणण्यानुसार, हेझलवूडने आयपीएलमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली, ते पाहता त्याला केन रिचर्डसनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये वारंवार संधी देण्यात आली.

या संदर्भात स्पोर्ट्सकीडाच्या प्रश्नाला उत्तर देताना फिंच म्हणाला की, ”हेझलवूड आमच्या गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र होता. धोनीबरोबर सीएसकेकडून खेळताना त्याला मिळालेला अनुभव आम्हाला खूप उपयोगी पडला. कोणत्या लाईन-लेंथवर गोलंदाजी करायची आहे आणि हार्ड लेन्थ गोलंदाजी केव्हा करायची, हे त्याने खूप छान समजावून सांगितले. त्याने शेअर केलेले इनपुट स्पर्धेच्या शेवटी उपयोगी आले. ही माहिती त्याने सर्व गोलंदाजांना दिली हे खूप महत्त्वाचे होते.”

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार केन विल्यमसनच्या ८५ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १९ व्या षटकात फक्त दोन गडी गमावून ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाला गवसणी घातली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत २०१० साली दाखल झाला होता. पण त्यावेळी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते आणि त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here