चेन्नई: आयपीएलच्या १३वा हंगाम रद्द करण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसचे काही रुग्ण भारतात देखील आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या २९ मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा रद्द करावी अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

भारतीय नियामक मंडळाला स्पर्धा घेण्याची परवानगी देऊ नये, असे आदेश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. वकील जी अॅलेक्स बेंजिगर यांनी ही याचिका दाखल केली आहे. आयपीएलचा १३वा हंगाम येत्या २९ मार्च ते २४ मे या काळात होणार आहे. या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती एमएम सुंद्रेश आणि न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठा समोर १२ मार्च रोजी होणार आहे.

भारतात बुधवारीपर्यंत करोनाचे ६१ रुग्ण आढळले होते. केंद्र सरकार आणि आरोग्य विभाग हा व्हायरस रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.

दरम्यान, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने मिझोरामची राजधानी ऐझॉल येथे होणाऱ्या संतोष ट्रॉफीच्या फायनल फेरीचे सामने रद्द केले आहेत. हे सामने १४ ते २७ एप्रिल दरम्यान होणार होते.

वाचा-
जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध तयार झाले नसल्याचे म्हटले आहे. इटली फुटबॉल फेडरेशन लीगने देशात होणारे सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे, याचिकेत म्हटले आहे.

याचिका करणाऱ्या वकीलाने याआधी आयपीएल रद्द करण्याची विनंती संबंधित विभागाला केली होती. पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर न दिल्याने न्यायालयात याचिका दाखल केल्याचे म्हटले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याआधीच आयपीएल रद्द होणार नसल्याचे म्हटले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here