रांची : लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका जिंकली आहे. भारताेन या मालिकेत आता २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने भारतापुढे विजयासाठी १५४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राहुल-रोहित जोडीपुढे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना लोटांगण घालावे लागले. त्यामुळे भारताने या सामन्यात न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला. लोकेश राहुलने यावेळी ४९ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांसह ६५ धावांची खेळी साकारली. रोहितने यावेळी ३६ चेंडूंत एक चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५५ धावांची धडेकाबीज खेळी केली.

न्यूझीलंडच्या १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित आणि राहुल यांनी धमाकेदार फटकेबाजीचा नुमना पेश केला. या दोघांनीही या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. त्यापूर्वी भारताच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडला १५३ धावांवर रोखत विजयाचा पाया रचला होता. त्यावर रोहित आणि राहुल यांनी विजयाचा कळस चढवल्याचे पाहाला मिळाले. कारण या दोघांनी धडाकेबाज फटकेबाजी करत भारताला विजय मिळवण्यात सिंहाचा वाटा उचलला.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी यावेळी धडाकेबाज सुरुवात केली. खासकरून भारताचा मार्टिन गप्तिलने यावेळी भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. गप्तिलने पहिल्या दोन्ही चेंडूवर चौकार लगावत संघाला भन्नाट सुरुवात करून दिली. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर गप्तिलचा झेल उडाला होता. हा झेल पकडण्यात भारताच्या लोकेश राहुलला अपयश आले. त्यामुळे गप्तिलला ८ धावांवर असताना जीवदान मिळाले. या जीवदानाचा चांगलाच फायदा यावेळी गप्तिलने उचलला आणि भारतीय गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. गप्तिलने यावेळी फक्त १५ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३१ धावांची खेळी साकारली आणि संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. गप्तिल बाद झाल्यावर न्यूझीलंडचा दुसरा सलामीवीर डॅरिल मिचेल (३१) आणि मार्क चॅम्पमन (२१) यांनाही मोठी खेळी साकरण्यात अपयश आले. भारताकडून यावेळी पदार्पण करणाऱ्या हर्षलने मिचेलला बाद करत आपली पहिली विकेट मिळवली. भारताने न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही आणि त्यामुळेच भारताला त्यांच्या धावसंख्येला वेसण घालता आले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here