‘करोना’ वायरसमुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलल्या जात आहेत. चीनमधून सुरू झालेला करोना व्हायरस जगभर पसरला आहे. गेल्या काही दिवसात भारतात देखील याचे रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ६० वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर २९ तारखेपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धा रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची बैठक झाली. या बैठकीमध्ये यंदाच आयपीएल खेळवू नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय आयपीएलच्या प्रशासकीय समितीवर सोपवण्यात आला आहे. आयपीएलच्या प्रशासकीय समितीची महत्वपूर्ण बैठक या आठवड्याच्या अखेरीस होणार आहे. या बैठकीमध्ये यंदाचे आयपीएल खेळवायचे, पुढे ढकलायचे किंवा नाही खेळवायचे हा निर्णय होणार असल्याचे समजत आहे.
वाचा-
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ” आज आमची एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये यंदाची आयपीएल खेळवू नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. पण या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क आयपीएलच्या प्रशासकीय समितीकडे आहेत. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय त्यांच्यावर असेल. पण यंदा आयपीएल खेळवू नये, असाच सल्ला आम्ही त्यांना दिला आहे. आता नेमका काय निर्णय घ्यायचा हे आयपीएल प्रशासकीय समिती ठरवेल.”
केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत परदेशी खेळाडूंना व्हिसा देणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच आयपीएल स्पर्धा प्रेक्षकांशिवाय घेण्यास काहीच हरकत नसल्याचे म्हटले आहे. यामुळे करोना व्हायरस पसरण्याचा धोका टळेल. केंद्राच्या या मतावर अद्याप बीसीसीआयने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आयपीएलमधील संघांनी मात्र या गोष्टीला हिरवा कंदील दिला आहे. प्रेक्षकांशिवाय स्पर्धा होणार असतील तर त्याला आमचा विरोध असणार नाही, असे एका संघाच्या प्रवक्त्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times