मुंबई महिला क्रिकेट स्कोअरर: भारतीय क्रिकेटची पंढरी अशी मुंबईची ओळख आहे. या मुंबईनं आजवर देशाला अनेक रथीमहारथी खेळाडूंची देणगी दिली आहे. त्याच मुंबईत खेळवल्या जाणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या कसोटीत पहिल्यांदाच दोन महिला स्कोररची जबाबदारी पार पाडणार आहेत. या कसोटी सामन्यासाठी क्षमा साने (Kshma Sane) आणि सुषमा सावंत (Sushma Sawant) या दोघींची बीसीसीआयनं अधिकृत स्कोरर म्हणून नियुक्ती केली आहे. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच एका कसोटी सामन्यात स्कोरिंगची जबाबदारी ही दोन महिला स्कोररर्सकडे असणार आहे.

मुंबई उपनगरातल्या नाहूरमधील क्षमा साने 2010 साली बीसीसीआयची स्कोररची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर गेल्या दहा वर्षात त्यांनी राष्ट्रीय तसच अनेक आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामन्यात स्कोरर म्हणून काम पाहिलंय.

Mumbai Women Cricket Scorer : मुंबई कसोटीत स्कोरिंगची सूत्रं 'ती'च्या हाती

क्षमा साने या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एक आघाडीच्या स्कोरर आहेत. पण त्यांचं मुंबई क्रिकेटमधलं योगदान हे केवळ स्कोरर म्हणून नाही. त्यांनी 1990 साली मुंबईकडून अंडर-15 क्रिकेटही खेळलंय. त्यानंतर 1996 साली त्यांनी पंच परीक्षाही दिली. या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या, पण पुढे यामध्ये कारकीर्द करण्याचं त्यांनी टाळलं. त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजेच 2006 साली क्षमा साने यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्कोररची परीक्षा दिली. आणि 2010 साली त्या बीसीसीआयची स्कोरर परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

Mumbai Women Cricket Scorer : मुंबई कसोटीत स्कोरिंगची सूत्रं 'ती'च्या हाती

क्षमा यांच्यासोबत स्कोरर म्हणून काम पाहणाऱ्या सुषमा सावंत यादेखील बीसीसीआयच्या 2010 च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्कोरर. त्या पेशानं अकाऊंटंट आहेत. सुषमा सावंत यांनीही गेल्या 10 वर्षात बीसीसीआयच्या अनेक स्पर्धा, आयपीएल, ज्युनियर क्रिकेट, एमसीएच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धा आणि इतर सान्यात स्कोरिंग केलंय. 2013 सालच्या महिला विश्वचषकात हा त्यांच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड.

भारतातल्या कसोटी सामन्यात दोन महिला स्कोररर्सच्या नियुक्तीचा हा योग केवळ दुसऱ्यांदा जुळून येत आहे. याआधी सौराष्ट्रच्या सेजल दवे आणि हेमाली देसाई यांनी कसोटी सामन्यात स्कोरिंग केलं होतं. 2016 साली इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत त्यांनी स्कोरिंग केलं होतं.

भारत न्यूझीलंड कसोटीसाठी क्षमा साने आणि सुषमा सावंत यांची बीसीसीआयकडून झालेली निवड ही मुंबई क्रिकेटच्या अनेक स्पर्धांमध्ये स्कोररचं काम करणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणा देणारी आहे. मुंबईत अनेक सामने हे ओव्हल मैदान, आझाद मैदान, क्रॉस मैदान शिवाजी पार्कमध्ये होतात. इथे अनेक ठिकाणी स्कोरिंग करताना अनेक वेळा महिला स्कोरर्सची कुचंबणा होते ती तिथे खासकरुन महिलांसाठी नसलेल्या सोईंमुळे. पण महत्वाच्या स्पर्धांचा अपवाद वगळता शालेय आणि कांगा लीगसारख्य़ा स्पर्धांचे सामने अशाच मैदानांमध्ये होतात. आणि तिथे स्कोरिंग करण्यावाचून पर्याय नसतो.

क्रिकेट सामन्यात काय असते स्कोररची भूमिका?

Scorer is the first historian of the match असं म्हटलं जातं. कारण सामन्यातली प्रत्येक बारीकसारीक गोष्ट टिपून ठेवण्याचं काम हे स्कोररचं असतं. कोणी किती धावा केल्या? त्यासाठी किती चेंडू खेळले? षटकार-चौकार, विकेट्स आणि इतर अनेक छोट्या मोठ्या बाबी टिपून ठेवण्याचं काम स्कोररचं असतं. थोडक्यात स्कोरर हे पडद्यामागचे कलाकार असतात. पण त्यांचं काम हे सर्वात जबाबदारीचं असतं. कारण एक धाव आणि एका चेंडूमुळे अख्ख्या सामन्याचा निकाल पालटू शकतो, हे तुम्हा आम्हा सर्वांनाच ठावूक आहे.

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here