महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली. त्यानंतर आता आयपीएलही पुढे ढकलली जाऊ शकते असे वृत्त हाती येत आहे. संचारबंदीनंतर आता एप्रिल या महिन्याच्या अखेरपर्यंत बीसीसीआय थांबू शकते आणि परिस्थिती सुधारल्यास आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेऊ शकते. पण एप्रिलच्या अखेरपर्यंत निर्णय घेण्याची बीसीसीआयकडे मुदत असेल. कारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांना आयपीएल सुरु करावी लागेल, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता आयपीएल अजून पुढे ढकलण्यात येऊ शकते. बीसीसीआय एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व गोष्टींवर नजर ठेऊन असेल.

सूत्रांनी सांगितले की, ” बीसीसीआय सध्याच्या घडीला सर्व गोष्टी पाहते आहे. त्यामुळे भारतामध्ये करोना व्हायरसमुळे कशी परिस्थिती आहे, याचे अवलोकन बीसीसीआय एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत करणार आहे. त्यानंतर आयपीएलबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येऊ शकतो. पण जर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर आयपीएलचा पहिला सामना झाला नाही तर आयपीएल रद्द करावी लागेल.”

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

जगभरात सध्याच्या घडीला अशीच अवस्था आहे. त्यामुळे आयपीएल खेळवायचे झाले तरी नेमके कुठे खेळवायचे, हा प्रश्न बीसीसीआयपुढे कायम आहे. सध्याचे वातावरण पाहता एप्रिल महिन्यात कोणतीही मोठी गोष्ट भारतामध्ये होऊ शकत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे बीसीसीआयला आता एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत थांबावे लागेल, असे म्हटले जात आहे.

सध्या बीसीसीआय सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. आयपीएल २९ मार्चला सुरु होणार होती. पण करोना व्हायरसमुळे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता बीसीसीआयला अजून थोडे थांबावे लागेल असे वाटत आहे. पण जर मे महिन्यापर्यंत परिस्थिती सुधारली नाही तर बीसीसीआयला मोठा निर्णय घ्यावा लागेल. कारण त्यानंतर आयपीएल सुरु केल्यास आंतरराष्ट्रीय वेळापत्रक बिघडू शकते, असेही म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here