भारतीय संघ २००४ साली बऱ्याच वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेतील पहिला सामना मुल्तान येथे २८ मार्चला खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताचे नेतृत्व राहुल द्रविड करत होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला होता आणि द्रविडने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सेहवागबरोबर भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आकाश चोप्रा उतरला होता.
सेहवाग आणि आकाश यांनी भारताला दमदार सलामी करून दिली. भारताने जेव्हा एकही विकेट न गमावता १५० धावा केल्या होत्या, तेव्हा सेहवागने आपले शतक पूर्ण केले होते. त्यानंतर दहा धावांमध्येच आकाश ४२ धावांवर बाद झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी सेहवागने नाबाद द्विशतक झळकावले होते.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ मार्चला सेहवागचे त्रिशतक पाहायला मिळाले. या दिवसाच्या उपहारापर्यंत सेहवाग २५० धावांपर्यंत पोहोचला होता. उपहारानंतर सेहवागने आपले त्रिशतक पूर्ण करत इतिहास रचला होता. सेहवागने यावेळी ३६४ चेंडूंत ३८ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने आपल्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक साजरे केले होते. त्याचबरोबर यावेळी सेहवाग हा भारताचा असा फलंदाज झाला होता ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये तिनशे धावांची खेळी साकारली होती.
या डावात सेहवागने ३७५ चेंडूंचा सामना करताना ३९ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ३०९ धावांची खेळी साकारली होती. पाकिस्तानच्या धर्तीवर या आतापर्यंतचा सर्वाधिक धावा होत्या. त्याचबरोबर यापूर्वी भारताच्या एकाही क्रिकेटपटूला यापूर्वी त्रिशतक झळकावता आले नव्हते. त्यामुळे भारताकडून पहिल्या त्रिशतकाचा मान सेहवागला मिळाला आणि त्यामुळे सेहवागला मुल्तानचा सुलतान ही पदवी देण्या आली. हा सामना भारताने एक डाव आणि ५२ धावांनी जिंकला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times