नॉर्थ साऊंड : युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकात भारताच्या संघाने इंग्लंडच्या धावसंख्येला चांगलाच लगाम लावला. भारताच्या राज बावा आणि रवी कुमार यांनी यावेळी भेदक मारा करत इंग्लंडच्या संघाचे कंबरडे मोडले आणि त्यांच्या धावसंख्येला वेसण घातले. भारताने इंग्लंडची ६ बाद ६१ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर इंग्लंडच्या जेम्स रेवने १२ चौकारांच्या जोरावर ९५ धावांची खेळी साकारली आणि संघाची धावसंख्या वाढवली. जेम्स खेळत असताना इंग्लंड मोठी धावसंख्या उभारेल, असे वाट होते पण रवी कुमारने त्याला बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. रवी आणि राज यांच्या अचूक गोलंदाजीमुळे भारताने इंग्लंडला १८९ धावांमध्ये रोखले आणि विजयाचा पाया रचला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे भारताच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. भारताचा वेगवान गोलंदाज रवी कुमारने यावेळी इंग्लंडला सुरुवातीला दोन धक्के दिले. रवी कुमारने यावेळी पहिल्यांदा जेकब बेथेलला दोन धावांवर बाद केले आणि इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर रवी कुमारने इंग्लंडचा कर्णधार टॉन प्रेस्टला त्रिफळाचीत केले, टॉमला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. रवी कुमारनंतर राज बावाने अचूक आणि भेदक मारा करत इंग्लंडच्या संघाला आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले.

राजने यावेळी पहिल्यांदा खेळपट्टीवर पाय रोवून उभ्या असलेल्या जॉर्ज थॉमला २७ धावांवर बाद केले आणि इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्यानंतर राजने १३व्या षटकात कमालच केली. १३व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर राजने विल्यम लक्स्टनला चार धावांवर बाद केले. त्यानंतर राजने या षटकाच्याच सहाव्या चेंडूवर जॉर्ज बेलला बाद केले. जॉर्जला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. राजने त्यानंतर रेहान अहमदला बाद करत इंग्लंडला सहावा धक्का दिला. अहमदला यावेळी १० धावांवर समाधान मानावे लागले. आपल्या मध्यमगती गोलंदाजीने राजने इंग्लंडच्या फलंदजांना चांगलेच जखडून ठेवले होते. राजने जेव्हा चार विकेट्स मिळवल्या होत्या, तेव्हा त्याने फक्त १४ धावांत या चारही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. राजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही भेदक गोलंदाजी करत चार विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडच्या जेम्स रेवने काही काळ दमदार फलंदाजी करत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच इंग्लंडला शतकाची वेस ओलांडता आली. पण त्याचवेळी कौशल तांबेने इंग्लंडच्या अॅलेक्स हॉर्टनला बाद करत इंग्लंडला अजून एक धक्का दिला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here