भारताने आजच्याच दिवशी २०११ साली विश्वचषक जिंकला होता. भारताने हा विश्वचषक कसा जिंकला, हे सर्वांनाच माहिती आहे. पण हा विश्वचषक जिंकल्यावर नेमकं काय घडलं, हे बऱ्याच जणांना माहिती नसेल.

भारताने जेव्हा विश्वचषक जिंकला तेव्हा पेव्हेलियनमध्ये सर्वच खेळाडूंनी जल्लोष केला. एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वांच्याच नजरा होत्या त्या भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरवर. कारण २१ वर्षे देशाची सेवा केल्यावर त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच ही गोष्ट आली होती. खेळाडूंना भेटल्यावर सचिन पत्नी अंजलीला भेटला. अंजलीला त्याने मिठी मारत आपला आनंद साजरा केला. त्यानंतर तो मैदानात उतरला. सर्व खेळाडू सचिनची वाट पाहत होते. त्यावेळी काही खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यावर घेत वानखेडे स्टेडियमला एक फेरी मारली. सर्व सेलिब्रेशन करून सचिन जेव्हा पेव्हेलियनमध्ये आला तेव्हा त्याला आपला चाहता असलेल्या सुधीरची आठवण झाली. प्रत्येक सामन्यात अंगावर तिरंग्याचा रंग लावून हा सुधीर संघाला प्रोत्साहन देत होता. सचिन पेव्हेलियनमधून बाहेर आला आणि सुधीरला हाक मारली. स्टेडियममध्ये भरपूर आवाज होता. तरी सुधीरला आपल्या देवाची हाक ऐकायला आली आणि तो पेव्हेलियनमध्ये गेला. त्यावेळी विश्वचषक हा वेगवान गोलंदाज झहीर खानच्या हातामध्ये होता. सचिनने तो विश्वचषक सुधीरला द्यायला सांगितला. सुधीरने तो विश्वचषक हातात घेतला आणि जोरदार आरोळी ठोकली. त्यावेळी भारतीय खेळाडूही सुधीरबरोबर सेलिब्रेशनमध्ये सामील झाले.

भारतीय संघ जेव्हा आपल्या बसमध्ये बसण्यासाठी पेव्हेलियनमधून खाली उतरत होता. तेव्हा तेथील सुरक्षारक्षकांनी एकच जल्लोष केला. सर्व खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी खेळाडूंना सुरक्षितपणे बसमध्ये बसवले. पण चाहते काही काळ बसजवळच उभे होते. यावेळी सचिनला पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली होती. सचिन यावेळी आपल्या दोन्ही मुलांना मांडीवर घेऊन बसला होता आणि चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होता. थोड्यावेळाने खेळाडूंची बस निघाली ते थेट ताज हॉटेलमध्ये. कारण भारतीय संघ तिथेच थांबलेला होता. ताज हॉटेलच्या परीसरात चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. भारतीय संघानेही सर्व चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. भारतीय संघाला आता रात्रभर सेलिब्रेशन करायचे होते. चाहते रस्त्यांवर उतरलेले होते. चाहत्यांनी रस्ते फुललेले होते. रस्त्यावर ट्रॅफिक एवढी होती की, आयसीसीचे अधिकारी डेव्ह रीचर्ड्सन यांनी गाडीमधून उतरून चालत आपले हॉटेल गाठावे लागले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here