ही गोष्ट आहे न्यूझीलंडच्या दौऱ्याची. जेव्हा मोहम्मद अझरुद्दिन भारताचा कर्णधार होता आणि माजी कर्णधार अजित वाडेकर हे संघाचे व्यवस्थापक होते. या दौऱ्यात एका सामन्यापूर्वी या दोघांपुढे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर सचिनने तोडगा काढला होता.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय सामना होता. पण सामन्याच्या काही तासांपूर्वीच भारताचा सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धू हा फिट नसल्याचे अझर आणि वाडेकर यांना समजले होते. त्यावेळी भारताच्या सलामीची धुरा कोण वाहणार, हा प्रश्न त्यांच्यापुढे पडलेला होता.
यावेळी सचिनने ही गोष्ट ड्रेसिंग रुममध्ये ऐकली. त्यावर सचिन म्हणाला की, ” मी सलामीला जायला उत्सुक आहे. कारण मला विश्वास होता की, तमी गोलंदाजीवर जोरदार आक्रमण करू शकतो. त्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारला की, तुला सलामीला का जायचे आहे? त्यावर मी त्यांना म्हणालो की, माझा खेळ हा आक्रमक आहे. फक्त मोठे फटके मी मारत नाही. मला स्वत:वर विश्वास आहे. जर मी अपयशी ठरलो तर मी पुन्हा तुमच्याकडे येणार नाही, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी मला सलामीला पाठवायचे ठरवले.”
यानंतर सचिन म्हणाला की, ” मी जेव्हा हॉटेलवरून स्टेडियमला निघत होतो. त्यावेळी ही गोष्ट मला माहिती नव्हती. स्टेडियममध्ये आल्यावर ही गोष्ट मला कळली. त्यावेळी संघ अडचणीत येऊ नये आणि हे आव्हान आपण स्वीकारायला हवे, असे मला वाटत होते. त्यामुळे मी सलामीला जायला तयार आहे, ही गोष्ट त्यांना मी सांगितली. यापूर्वी पहिली पंधरा षटके शांतपणे फलंदाजी करायची असा ट्रेंड होता. न्यूझीलंडच्या मार्क ग्रेडबॅच यांनी त्यावेळी नवीन ट्रेंड आणायला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या पंधरा षटकांमध्ये जर जोरदार आक्रमण केले तर प्रतिस्पर्धी संघ दडपणाखाली येईल, असे मला वाटत होते.”
सचिनने या सामन्यात पहिल्यांदाच सलामीला येताना ४९ चेंडूंत ८२ धावांची आक्रमक खेळी साकारली होती. तेव्हापासून क्रिकेट जगताला एक विक्रमादित्य सलामीवीर म्हणून मिळाला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times