लखनऊ: भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना आज, गुरुवारी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या कामगिरीवर खिळल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाने जबरदस्त मालिका विजय मिळवला. त्यानंतर हा विजयरथ पुढे सुरूच ठेवण्याच्या इराद्याने टीम इंडिया पुन्हा मैदानात उतरणार आहे. श्रीलंकाविरुद्धचा पहिला टी-२० सामना लखनऊच्या अशा मैदानावर खेळवला जाणार आहे, जिथे टीम इंडियानं काही मोजकेच सामने खेळले आहेत. लखनऊच्या क्रिकेटच्या मैदानावरील पिच आणि येथील हवामान कसं असेल, हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानात टीम इंडिया आपला ‘जलवा’ दाखवण्यास सज्ज आहे. हेच मैदान आयपीएल टीम लखनऊ सुपर जायंट्सचे घरचे मैदानही असेल. येणाऱ्या काही दिवसांत या मैदानात खूप सामने पाहायला मिळणार आहेत. त्याची सुरुवातीची झलक ही गुरुवारी क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात हा सामना होणार असून, श्रीलंकेला पराभूत करण्याच्या पक्क्या इराद्यानेच हिटमॅनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उतरणार आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात या मैदानात पहिल्यांदाच सामना खेळवला जाणार आहे.

IND v SL : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात होणार तीन मोठे बदल, जाणून घ्या कोणाला मिळणार संधी
टी-२० विश्वचषकासाठी कसा असणार भारतीय संघ, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केला मोठा खुलासा

‘अशी’ असेल पिच

टीम इंडिया गुरुवारी लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये उतरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत या पिचवर सुरुवातीपासूनच श्रीलंकेवर दबाव निर्माण करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल. आतापर्यंत टीम इंडियाने या मैदानात केवळ एकच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरोधात तो सामना खेळवला होता. टीम इंडियाने तो सामना ७१ धावांनी जिंकला होता. त्यानंतर या मैदानावर तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले. तिन्ही सामने हे अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाले होते. गुरुवारी टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिलाच सामना होणार आहे. विशेष म्हणजे या मैदानात आतापर्यंत झालेल्या चार टी-२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने धावांचा डोंगर उभा केला आहे.

कर्णधार रोहित शर्माने जाहीर केला त्याचा उत्तराधिकारी; पाहा कोण तो खेळाडू

लखनऊचं हवामान जाणून घ्या

आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिला टी-२० सामना होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड असल्याचे दिसतेय. येथील हवामान कसे असेल याचीही उत्सुकता आहे. गुरुवारी लखनऊत ढगाळ वातावरण असेल. हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना गारवा जाणवेल. दिवसा कमाल तापमान २८ अंश सेल्सिअसच्या आसपास आणि संध्याकाळी किमान तापमान १५ अंश सेल्सिअस असेल असा अंदाज आहे. पावसाची कोणतीही शक्यता नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here