सूर्यकुमार यादव अंगठ्याच्या दुखापतीमुळे आणि दीपक चहरला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या आधीच टी-२० मालिकेतून बाहेर पडले आहेत. के.एल. राहुलही जखमी आहे त्यामुळे तो टी-२० मालिकेत खेळणार नाही. दुसरीकडे विराट कोहली आणि रिषभ पंत यांना बीसीसीआयने ब्रेक दिला आहे. त्यामुळे आता भारताकडे १६ जणांचा संघ आहे.
अशा स्थितीत ईशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन या खेळाडूंना चांगली संधी मिळेल. टीम इंडिया आपल्या शेवटच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध चार गोलंदाजांसह मैदानात उतरली होती. पाचवा गोलंदाज म्हणून अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर हा पर्याय उपलब्ध आहे.
रवींद्र जडेजा पुन्हा संघात परतल्यामुळे फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीच्या क्रमवारीतही बदल होतील. या आधीच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने ईशान किशनसोबत भारताच्या डावाची सुरुवात केली होती. त्यामुळे श्रेयस अय्यर तिसऱ्या, तर कर्णधार रोहित चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. आता रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध हाच फलंदाजी क्रम ठेवणार की ईशान किशनला खालच्या क्रमांकावर पाठवून ऋतुराजसोबत डावाची सुरुवात करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे :-
भारत :
ऋतुराज गायकवाड, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.
श्रीलंका :
पथुम निसांका, दानुष्का गुणथिलका, कामिल मिशारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडीमल, चरित असलंका, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, जेफ्री वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंथा चमिरा, लाहिरू कुमारा.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times