भारतीय संघाच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही विराट कोहलीला पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर त्यानं कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं होतं. आरसीबी संघाचं कर्णधारपद का सोडलं यामागचं कारणही त्यानं ‘द आरसीबी पॉडकास्ट’वर सांगितलं. एखाद्या गोष्टीला चिकटून राहणाऱ्यांपैकी मी नाही. इतकंच नाही तर, जर मी एखाद्या गोष्टीचा पूर्ण आनंद घेऊन शकत नसेल तर, मी ती जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडू शकत नाही. परंतु मी यात बरंच काय करू शकतो, हे मला स्वतःला चांगलंच ठाऊक आहे, हेही मी स्पष्ट करू इच्छितो, असं तो म्हणाला. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली म्हणाला की, एखाद्या क्रिकेटपटूनं अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास त्याच्या मनात काय चाललंय हे समजून घेणं लोकांना खूपच कठीण जातं. लोकांना अपेक्षा खूप असतात. त्यामुळे हे असं अचानक कसं घडलं, असा प्रश्न त्यांना पडतो.
विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेट रसिकांना एक ना अनेक प्रश्न पडले आहेत. याबाबतही त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. ‘माझ्या निर्णयाबाबत आश्चर्यचकित होण्याचं काही कारण नाही. मला स्वतःसाठी काही वेळ हवा आहे. वर्क मॅनेजमेंट करायचं होतं,’ असं कोहली म्हणाला. आरसीबी संघानं अद्याप एकही आयपीएल जेतेपद पटकावलेलं नाही. त्यावरून अनेकदा विराट कोहलीवर टीका झालेली आहे. त्यात आता कर्णधारपद सोडल्यामुळं अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या चर्चांनाही त्यानं पूर्णविराम दिला. मला एखादा निर्णय घ्यायचा असतो, तो मी घेतोच, असं तो म्हणाला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times