तेंडुलकरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”माझी टीम आवश्यक ती कायदेशीर कारवाई करेल, पण ही माहिती सर्वांसोबत शेअर करणे मला महत्त्वाचे वाटते. माझ्या लक्षात आले आहे की, सोशल मीडियावर अनेक जाहिराती दाखवल्या जात आहेत, ज्यामध्ये मॉर्फ्ड फोटोद्वारे मी एका कॅसिनोची जाहिरात करत असल्याचेही दाखवण्यात येत आहे. मी वैयक्तिकरित्या कधीच जुगार, तंबाखू किंवा दारूचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रचार केला नाही. लोकांची दिशाभूल करण्यासाठी माझ्या फोटोंचा वापर केला जात आहे, हे पाहून वाईट वाटते.”
आपली छायाचित्रे लोकांची दिशाभूल करण्यासाठी वापरली जात असल्याची खंत सचिन तेंडुलकरने व्यक्त केली. ४८ वर्षीय माजी क्रिकेटपटूने आयुष्यभरात कधीही जुगार, तंबाखू आणि दारूची जाहिरात केलेली नाही. २०१३ मध्ये सचिनने क्रिकेटमधून संन्यास घेतला. तो आता फक्त एक मार्गदर्शक म्हणून मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. तसेच तो कधीकधी कॉमेंट्री करतानाही दिसतो. सचिन हा क्रिकेट जगतातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक आहे. २०० कसोटीत १५,९२१ धावा, ४६३ एकदिवसीय सामन्यात १८,४२६ धावा केल्या आहेत. तसेच तो कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times