करोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएलबाबत १५ एप्रिलला निर्णय अपेक्षित आहे. काही जणांनी आयपीएल दोन महिन्यांनी खेळवावी, असे म्हटले होते. पण या गोष्टीला भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराने विरोध केला आहे. आयपीएल ऑक्टोबर महिन्यात खेळवली तर ती यशस्वी होऊ शकते, असे मत नेहराने व्यक्त केले आहे.

नेहरा म्हणाला की, ” सध्याच्या घडीला आयपीएल खेळवण्यासाठी चांगले वातावरण नाही. काही लोकांनी आयपीएल ऑगस्ट महिन्यात खेळवले जाऊ शकते, असे म्हटले आहे. पण माझ्यामते ऑगस्टमध्ये काही गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आयपीएल ऑगस्टऐवजी ऑक्टोबर महिन्यात खेळवले तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो.”

नेहरा पुढे म्हणाला की, ” काही आजी-माजी क्रिकेटपटूंनी आयपीएल ऑगस्टमध्ये खेळवावी, असे म्हटले आहे. पण भारतामध्ये ऑगस्ट महिन्यात पाऊस सुरु असेल. त्यामुळे आयपीएलचे सामने खेळवायला अडचण होऊ शकते. त्यापेक्षा आयपीएल ऑक्टोबरमध्ये खेळवले तर त्याचे आयोजन अधिक चांगले होऊ शकते.”

इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने काही दिवसांपूर्वी या विषयावर आपले मत व्यक्त केले होते. पीटरसन म्हणाला होता की, ” परिस्थिती सामान्य झाल्यावरच आयपीएल खेळवले जाऊ शकते. काहींनी जुलै-ऑगस्ट महिन्यात आयपीएल खेळवावे, असे आपले मत व्यक्त केले आहे. पण जुलै आणि ऑगस्टमध्ये आयपीएल खेळवणे आततायीपणाचे किंवा जास्त घाईचे होईल. त्यामुळे यानंतरच आयपीएल खेळवले तर त्याला चांगला प्रतिसादही मिळेल.”

यंदाची आयपीएल स्पर्धा ही २९ मार्चपासून सुरु होणार होती. पण करोना व्हायरसमुळे ती १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. १४ एप्रिलला भारत सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊनचा कार्यकाळ संपत असल्याने आयपीएलबाबतची घोषणा १५ एप्रिलला होणार होती. पण सध्याचे वातावरण पाहता १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल, असे वाटत नाही. कारण परिस्थिती जोपर्यंत पूर्ववत होत नाही, तोपर्यंत कोणतीही स्पर्धा भारतामध्ये खेळवण्यात येणार नाही. त्यामुळे आयपीएलच्या चाहत्यांना थोडा काळ अजून कळ सोसावी लागेल, असेच दिसत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here