सध्याच्या घडीला करोना व्हायरसचा मोठा फटका क्रीडा जगताला बसलेला आहे. त्यामुळे सध्या एकही क्रीडा स्पर्धा होताना दिसत नाही. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग हा चाहत्यांच्या प्रश्नांना ट्विटरच्या माध्यमातून उत्तरे देत आहे. यावेळी हॉगला भारताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण, असा सवाल विचारला होता. या प्रश्नावर हॉगने जडेजाचे नाव सांगितले आहे.
एका चाहत्याने हॉगला एक प्रश्न विचारला होता. युवराज सिंग, विराट कोहली, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांच्यापैकी कोणता खेळाडू चांगला क्षेत्ररक्षक आहे. यावर उत्तर देताना हॉग म्हणाला की, ” हे चौघेही चांगले क्षेत्ररक्षक आहे. हे चौघे असताना मला गोलंदाजी करायला नक्कीच आवडली असती. पण या चौघांपैकी जर एका खेळाडूचे नाव घ्यायचे असेल तर मी रवींद्र जडेजाचे नाव घेईन.”
आतापर्यंत भारताला चांगल्या क्षेत्ररक्षकांची परंपरा लाभली आहे. रॉबिन सिंग, अजय जडेजा यांच्यापासून मोहम्मद कैफ, युवराज सिंग आणि आता थेट विराट कोहलीपर्यंत भारताला चांगले क्षेत्ररक्षक मिळाले आहेत. पण या क्षेत्ररक्षकांपैकी सर्वोत्तम कोण, हे निवडणे नक्कीच कठिण काम आहे. पण हॉगने हे आव्हान लीलया पेलले आहे.
भारताचे माजी ट्रेनर रामजी श्रीनिवासन यांनीही यावेळी जडेजाचे कौतुक केले आहे, जडेजा हा आपल्या फिटनेस आणि खेळावर लक्ष देत असतो, असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, ” जडेजा हा फिटनेससाठी चांगलाच घाम गाळतो.त्याचबरोबर त्याचे क्षेत्ररक्षण पाहा. प्रत्येकवेळी त्याच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण होत असते. हातात चेंडू आल्यावर त्याचा थ्रोदेखील अचूक असतो. त्यामुळे तो एक चांगला क्षेत्ररक्षक आहे,यामध्ये वादच नाही.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times