काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतापुढे एक प्रस्ताव ठेवला होता. करोनाशी लढण्यासाठी जो मदतनिधी लागेल तो भारत आणि पाकिस्तान यांचे सामने भरवून जमा करता येईल, असे मत अख्तरने मांडले होते. अख्तरच्या या प्रस्तावाला भारताचे माजी कर्णधार कपिल देल आणि सुनील गावस्कर यांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे आता ही मालिका शक्य नाही हे पाकिस्तानला कळून चुकले असेल. आता या प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही उडी घेतली आहे आणि त्यांनी भारतीय क्रिकेट मंडळाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी याबाबात म्हणाले की, ” बीसीसीआयवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही, ते बेभरवशी आहेत. भारत आणि पाकिस्तान हे आयसीसीच्या स्पर्धेत सामने खेळतात, तेवढं आम्हाला पुरेसे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय मालिका झाली तर ते चांगलेचं आहे. आम्ही त्याचा आनंदाने स्वीकार करू. कारण आम्हाला क्रिकेटमध्ये रस आहे आणि आम्ही क्रिकेट आणि राजकारण यांची चगल्लत करत नाही.”
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय मालिका व्हावी, यासाठीचा प्रस्ताव अख्तरने ठेवला होता. या प्रस्तावाला पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा आणि शाहिद आफ्रिदी यांनी होकार दिला होता. पण भारताच्या माजी कर्णधारांनी हा प्रस्ताव फेटाळला, त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आता आपले मत मांडले आहे.
एहसान मणी पुढे म्हणाले की, ” भारताबरोबर द्विदेशीय मालिका झाली नाही तर त्याचा फटका आम्हाला नक्कीच बसतो. पण आम्ही त्याबाबत जास्त विचार करत नाही. पण त्यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका अशक्य आहे. जर ही मालिका अशक्य असेल तर असो. आम्ही भारतावर अवलंबून नाही. आम्ही भारताविनाही जगू शकतो. आम्हाला जगण्यासाठी भारताची गरज नाही.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times