बॉलीवूडचे सदाबहार कलाकार ऋषी कपूर यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बऱ्याच जणांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ऋषी कपूर यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे.

ऋषी कपूर आणि रवी शास्त्री हे जवळपास एका पिढीतले. त्यामुळे या दोघांनी एकमेकांची कामे जवळून पाहिली. त्याचबरोबर आपल्या कामांबद्दल दोघांनाही आदर होता. त्यामुळे ऋषी कपूर यांच्या निधनानंतर शास्त्री यांना अतीव दु:ख झाले आहे. शास्त्री यांनी ऋषी कपूर यांच्या निधनानंतर एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शास्त्री यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” ऋषी कपूर यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे. ऋषी कपूर यांच्याबरोबर एकही क्षण कधीही निराश गेला नाही, ते सतत हसत असायचे. ऋषी कपूर यांच्या आत्म्याला शांती मिळो.”

सुरुवातीच्या काळात रोमँटिक भूमिकांमुळे, संगीतमय चित्रपटांमुळे प्रेक्षकांचे लाडके ठरलेल्या आणि पुढील टप्प्यात विविधरंगी भूमिकांद्वारे आपली छाप पाडणाऱ्या ऋषी कपूर यांनी गेली पाच दशके सलग तीन पिढ्यांचे मनोरंजन केले. उमद्या स्वभावाच्या आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या या ज्येष्ठ कलावंताच्या निधनाबद्दल कलाविश्वातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली. गुरुवारी सकाळी ऋषी कपूर यांचे जवळचे मित्र आणि सहकलाकार अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून ऋषी कपूर यांच्या निधनाची माहिती दिली.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या ऋषी कपूर यांनी दोन एप्रिलनंतर ट्विटरवर कोणतीही पोस्ट टाकलेली नव्हती. त्यामुळे त्यांची प्रकृती बरी नसल्याचा अंदाज गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर, ‘ऋषी कपूर रुग्णालयात असून ते कॅन्सरशी झुंज देत आहेत’ असे रणधीर कपूर यांनी बुधवारी सांगितले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यातही त्यांना दोनवेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी दक्षिण मुंबईत झाला. ‘चिंटू’ या टोपण नावानेही ते ओळखले जात. शोमॅन दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर यांचे ते दुसरे पुत्र. ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यासोबत त्यांनी मुंबईतील कॅम्पेन स्कूल कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण घेतले. रितू नंदा आणि रिमा जैन या त्यांच्या दोन भगिनी. ऋषी कपूर यांच्या पश्चात मुलगा रणबीर, मुलगी रिधिमा आणि पत्नी नीतू सिंग-कपूर आहेत. गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या देशभरातील लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे स्मशानभूमीत अधिक चाहत्यांना आणि जास्त संख्येने कलाकरांना उपस्थिती राहण्याची अनुमती नव्हती. अंतिम दर्शनासाठी केवळ निवडक मंडळी सामील झाले होते. यात मुलगा रणबीर कपूर, पत्नी नीतू सिंग, रणधीर कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, करिष्मा कपूर, अरमान जैन, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, आदर जैन, अनिल अंबानी, अयान मुखर्जी आदी मंडळी सहभागी होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here